10 April, 2019

हिंगोली मतदार संघात दिव्यांग मतदारांसाठी जय्यत तयारी




हिंगोली मतदार संघात दिव्यांग मतदारांसाठी जय्यत तयारी


हिंगोली,दि.10: 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणाऱ्या निवडणूकीत जिल्ह्यात 3 हजार 677 दिव्यांग मतदारांची नोंद झाली असून PWD App मुळे दिव्यांग मतदारांमध्ये वाढ होत आहे. तसेच 962 मतदान केंद्रावर ‘रॅम्प’ ची व्यवस्था करण्यात आली असून 39 मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर प्रवेश करून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य सहजतेने हाताळता यावे व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन, मतदान केंद्रांवर कोणतीही गैरसोय होऊ नये याकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, यांनी सर्व संबंधित विभागाला दिल्या होत्या.
त्यानुसारु संबंधित विभागानी दिव्यांग मतदानाची जय्यत तयारी केली असून 18 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मतदानासाठी 3 हजार 677  दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रात कोणत्याही अडथळयाशिवाय प्रवेश करण्यासाठी हिंगोली, वसमत व कळमनुरी या तीन विधानसभा मतदार संघातील क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत 39 मतदान केंद्रावर ‘रॅम्प’ ची व्यवस्था करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना सुखरूप मतदान केंद्रावर आणणे आणि मतदान करून घरी सुखरूपपणे सोडणे यासाठी सदर मतदान केंद्रावर स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांना तत्काळ मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येईल, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर देण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष वाहनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.
यावेळी रुचेश जयंवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी व भाऊसाहेब जाधव, भाऊराव चव्हाण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यासह पंचायत समितीचे, नगर पालिकेचे, नगर पंचायतीचे व समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दिव्यांगानी PWD App चा उपयोग करुन जास्तीत-जास्त दिव्यांग मतदारांनी नांव नोंदणी करावी व सर्वांनी गुरुवार 18 एप्रिल, 2019 रोजी सकाळी 7.00 ते  सांयकाळी 6.00 या वेळेत 100% मतदान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
****



No comments: