13 April, 2019

विविध प्रकरणात आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यावर कार्यवाही


विविध प्रकरणात आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यावर कार्यवाही


हिंगोली,दि.13: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याअनुषंगाने मतदार संघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी हे निवडणूक मतदान पूर्व तयारीच्या पाहणीकरीता दि. 12 एप्रिल रोजी किनवट मतदार संघाच्या दौऱ्यावर गेले असता त्यांनी विविध पक्षाच्या सहा प्रचार वाहनांची तपासणी केली. यापैकी पाच वाहनांची तपासणी करुन सोडून दिले तर एक वाहन जप्त करण्यात आले.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जयवंशी यांना किनवट येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी विविध पक्षाचे प्रचार वाहने निदर्शनास आले. सदर वाहनाची तपासणी केली असता, यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तीन आणि शिवसेना पक्षाच्या एका वाहनाच्या दर्शनी भागावर मूळ परवाना नसल्याचे निदर्शनास आले. परंतू सदर वाहनाचे कागदपत्र सोबत असल्याने संबंधीतांना सक्त ताकीद देत नोटीस देवून सदर वाहन सोडण्यात आले. तसेच वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या दोन वाहनांसोबत मूळ परवाना असल्याने सदर वाहनांची तपासणी करुन सोडण्यात  आले. परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचार वाहन क्र. एम.एच.22 ए ए 1924 या वाहनावर प्रकाशक, मुद्रक व प्रतिनीधी यांची नांवे नसल्याचे निदर्शनास आल्याने आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन प्रकरणी कार्यवाही करुन सदर वाहन जप्त करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख आदींची उपस्थिती होती.
कळमनुरी मतदारसंघात शुक्रवार दि. 12 एप्रिल, 2019 रोजी आखाडा बाळापूर येथे शिवसेना-भाजप युतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेत जाणाऱ्या लोकांना हनुमंत रामचंद्र गिते या इसमाने विनापरवाना मंडप, लोकांना खाद्य पदार्थ, पाण्याच्या बाटलीचे मोफत वाटप करुन प्रलोभन दाखवुन उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी खर्च केला. तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच शिवसेना-भाजप युतीच्या प्रचार सभेला लोकांची गर्दी व्हावी या उद्देशाने शिवसेना-भाजप युती पक्षामार्फत लोकांसाठी मोफत वाहनाची व्यवस्था करुन लोकांना सभेच्या ठिकाणी आणल्याची तक्रार निवडणूक निरीक्षक यांना प्राप्त झाली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश संबंधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली आहे.

****

No comments: