15 May, 2019

टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने केले नियोजन



टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने केले नियोजन

हिंगोली,दि.15 : राज्यात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, त्यावरील उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिनांक 9 व 10 मे 2019 रोजी  जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थितीचा पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आवश्यकतेनुसार पाणी टंचाई दूर करण्याकरिता सूचना दिल्या होत्या .
तसेच दिनांक 12 मे रोजी विविध वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई  संदर्भात हिंगोली तालुक्यातील  मौ. जयपूरवाडी  येथे पाण्याच्या टँकरची एक फेरी  व मौ. माळसेलू येथील 12 हजार लीटर क्षमतेचे टँकर मार्फत दररोज 3 फेऱ्या करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच मौ. येहळेगाव सोळंके ता. औंढा ना. येथे 2 टँकर द्वारे 5 फेऱ्या सुरु आहेत.तसेच मौ. शिवणी खु. ता. कळमनुरी येथे 1 टँकर द्वारे दररोज 2 फेऱ्या मंजूर करण्यात येऊन नगर पालिका येथील पाणी शुध्दीकरण प्लांट वरुन सदर टँकर ला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणेबाबत संबंधित गट विकास अधिकारी पं.स. कळमनुरी व मुख्याधिकारी न.प. कळमनुरी यांना कळविण्यात आले आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील टंचाई ग्रस्त 39 गावे व तांड्यांना 52 टँकरद्वारे व 346 गावांमध्ये 415 विहिर व बोअर अधिग्रहण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच 44 गावांमध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती च्या प्रस्तावांना , 8 गावांमध्ये तात्पुरती पुरक नळ योजनेच्या प्रस्तावांना, 136 नवीन विंधन विहीरींच्या प्रस्तावांना टंचाई अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
 तसेच सर्व संबंधित विभागांना टंचाई अंतर्गत अधिग्रहण, टँकर मंजुरीच्या प्रस्तावाना  प्रलंबित  न ठेवता तात्काळ मंजुरी देणे बाबत सूचना  देण्यात आल्या आहेत. तसेच शहरी व ग्रामीण भागाकरिता पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणांमध्ये आवश्यकतेनुसार  दिनांक 15 जुलै 2019 पर्यंत पुरेल इतक्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000000

No comments: