16 May, 2019

अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहीरींचे देयके त्वरीत पारीत करावेत -- पालक सचिव नितीन गद्रे


अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहीरींचे देयके त्वरीत पारीत करावेत
           -- पालक सचिव नितीन गद्रे

हिंगोली, दि. 16 : टंचाईच्या परिस्थीतीत अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहीरींचे देयके त्वरीत पारीत  करण्याची सूचना लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव तथा हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांनी केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत श्री. गद्रे बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.  दाताळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील,  सर्व तालुक्याचे तहसिलदार व गट विकास अधिकारी, यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी पालक सचिव श्री. गद्रे म्हणाले की, टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सद्यस्थितीत अधिग्रहन केलेल्या बोअर व विंधन विहरींची पुन:तपासणी करुन तात्काळ सद्य:स्थितीचा आढावा घेवून त्वरीत उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्ह्यातील टंचाईच्या काळात रोजगार हमी योजनेची विहीरींचे कामे वगळता नाला बांध, गाळ काढण्याची कामे , तलाव खोद कामे इत्यादी कामे राबवून नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे असेही श्री. गद्रे यावेळी म्हणाले.  
            पालक सचिव श्री. गद्रे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती पाहणी दौ-याअंतर्गत ज्या गावांना भेट दिली तिथे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेमार्फत टंचाईबाबत करण्यात आलेल्या नियोजनाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनामार्फत टंचाईच्या विविध कामांची शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती त्वरीत माझ्याकडे सादर करावी, अशी सूचनाही यावेळी त्यांनी दिली.
            प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार यांनी पॉवर पॉईंट प्रेझेनटेशनद्वारे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा, सन 2018 मधील खरीप पिकांच्या सुधारीत पैसेवारीचा गोषवारा, जिल्ह्यातील पाणी टंचाई आराखडा, तालुका निहाय टँकर व अधिग्रहन, पशुधनास आवश्यक वैरण उपलब्धतेविषयी सविस्तर माहिती दिली.
            पालक सचिव श्री. गद्रे यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांची पाहणी करतांना सिरसम खु, पेडगांव वाडी, कणका, कोंडुर, हातमाली व उमरखोजा या गावांना भेटी देवून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधुन सद्य:स्थितीत पाण्याची उपलब्धता, टँकर आणि अधिग्रहण करण्यात आलेल्या बोअर-विहिरींची माहिती  घेतली.
*****

No comments: