04 May, 2019

आता अतिसार कमी करण्यासाठी रोटा व्हायरस लसीकरण


आता अतिसार कमी करण्यासाठी  रोटा व्हायरस लसीकरण

हिंगोली,दि.4:  बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणुमुळे  होणारा अतिसार आणि यामुळे  होणारे बालमृत्यु रोखण्यासाठी आता आरोग्य विभागाकडून उपाययोजना आखल्या आहेत. अतिसाराला आळा घालण्यासाठी रोटा व्हायरस लसीकरण करण्यात येणार आहे. बालकांना  सदर लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सभागृहामध्ये सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्‍य  अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, यांची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह येथे आज घेण्यात आली.
 या कार्यशाळेला डॉ. मुजीब  सय्यद एस.एम.ओ. व डॉ. सावरगांवकर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. तुम्मोड म्हणाले की, सर्व संबंधितांनी या लसीकरणाचे प्रशिक्षण पूर्ण करुन निर्धारीत वेळेत रोटा व्हायरस लसीचा वापर  नियमित करावा.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार म्हणाले देशात रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांपैकी 40 टक्के मुले रोटा व्हायरसचे शिकार होतात. देशात 78 हजार मुलांचा यामुळे मृत्यू होतो. यातील 59 हजार मुले ही दोन वर्षाच्या आतील असतात.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास म्हणाले की, देशात दरवर्षी दीड लाख बालके जन्माला येतात. त्यामुळे या लसीकरणाचा फायदा त्यांना होईल. दीड महिना, अडीच महिना व साडेतीन  महिने असे तीन वेळा 2.5 एम.एल. लस तोंडावाटे दिली जाईल.
डॅा. मुजीब सय्यद म्हणाले, पहिल्या टप्प्यात चार राज्यात  ही लस सुरु  झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात साधारणत:  जून महिन्यात महाराष्ट्रासह 12 राज्यात रोटा व्हायरस  लसीकरणाची ही मोहीम सुरु होईल. यापूर्वी  ही लस खाजगी  रुग्णालयात  हजार ते पंधराशे  रुपयात मिळत होती. आता आरोग्य विभागामार्फत  ही लस मोफत मिळणार आहे.
यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीष रुणवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड,  डॉ. कोरडे, डॉ. देशमुख आदींची उपस्थिती होती.
नवजात बालकांना धोका
नवजात बालकांना रोटा व्हायरस विषाणुमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका अधिक प्रमाणात असतो. या व्हायरसचे संक्रमण झाल्यावर दोन तीन दिवसात लक्षणे दिसतात. प्रथम उलटी, मळमळ, संडास व त्यामुळे  शरीराचे डीहायड्रेशन व ईलेक्ट्रालाईट इम्बॅलेन्समुळे बालकाचा मृत्यू होऊ शकतो. पाच वर्ष  वयापर्यंत  बालक कूपोषित  होण्याचा धोका असतो. या रोगाचा कोणतीही चाचणी व विशेष उपचार उपलब्ध नसून केवळ लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. अनेकदा  सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील नवजात बालकांना रोटा व्हायरस  विरोधी लस घेता येणे परवडत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन  शासनाने आता रोटा व्हायरस लसीकरण मोहिम  हाती घेण्याचे ठरविले आहे.
****


No comments: