09 May, 2019


पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केला टंचाईग्रस्त भागांचा दौरा




हिंगोली, दि. 9 : राज्यात टंचाईग्रस्त परिस्थिती असून, त्यावरील उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या काळजीपोटी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती केली होती.  यास निवडणूक आयोगाने ही सकारात्मक प्रतिसाद देत टंचाईग्रस्त परिस्थितीत जनतेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता काही अंशी शिथिल केली आहे. त्यानुषंगाने पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आज जिल्ह्याच्या काही भागात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आज सर्वप्रथम पालकमंत्री श्री. कांबळे यांनी कळमनुरी तालूक्यातील मौजे उमरा येथील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधुन सद्यस्थितीत चालू टँकर आणि अधिग्रहण करण्यात आलेल्या बोअरची माहिती घेत समस्या जाणून घेतल्या. तसेच पदाधिकारी, अधिकारी यांच्याशी ही चर्चा केली.
यानंतर कळमनुरी तालूक्यातील मोजे शिवणी या गावास पालकमंत्री यांनी भेट देवून येथील महिला ग्रामस्थांशी संवाद साधून टंचाईच्या काळात सांडपाण्यासाठी एक व पिण्याच्या पाण्यासाठी एक असे रोज दोन टँकरद्वारे पाणी पूरवठा करण्याच्या संबंधीतांना सूचना दिल्या.
पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत कळमनुरी तालूक्यात प्रथम पुरस्कार प्राप्त मौजे रामवाडी येथे श्रमदानातून केलेल्या मातीनाला बांध कामाची पाहणी पालकमंत्री यांनी आज केली.  पालकमंत्री श्री. कांबळे यांनी सेनगांव तालुक्यातील मौजे हत्ता या गावातील चारा छावणीस भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी पाहणी दौऱ्यात विविध पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*****



No comments: