18 December, 2020

‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ उत्साहात साजरा

 


 

 हिंगोली, दि. 18 : जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत आज अल्पसंख्यांक हक्क दिवस अत्यंत उत्साहात कोव्हिड 19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेऊन केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ऑनलाईन पध्दतीने जिल्हा प्रशासनामार्फत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर, सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांनी अल्पसंख्यांक समुदायाबाबत अत्यंत अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले.

या ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांकासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत जिल्ह्यात अल्पसंख्यांक लोक समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाबाबत अत्यंत विस्तृत माहिती दिली. तसेच सद्यस्थितीत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी वसतीगृह, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, अल्पसंख्यांक ग्रामपंचायतींना अनुदान, नागरी भागातील अल्पसंख्यांकासाठी सुविधा, डॉ. झाकीर हुसेन मदरसांना अनुदान, खाजगी व विनाअनुदानित शाळांना मुलभूत सुविधासाठी अनुदान, मा. पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम आणि प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PVJMK) अंतर्गत हिंगोली शहरामध्ये सद्भावना मंडप बांधकाम करणे इत्यादी योजनांची सविस्तर माहिती दिली. यापुढेही अल्पसंख्यांकासाठीच्या योजना अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यात येतील, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे समन्वयक प्रभाकर मठपती यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व सर्व अल्पसंख्यांक जनतेचे आभार मानले.

****

No comments: