01 January, 2026

हिंगोली जिल्ह्यात मोबाईल वाहतूक नियम अंमलबजावणी प्रणाली कार्यान्वित

• रस्ता सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रणालीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते प्रारंभ हिंगोली (जिमाका), दि. 01 : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने मोबाईल वाहतूक नियम अंमलबजावणी प्रणाली (मोबाईल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टिम) ही अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अतुल बानापुरे, विकास नाईकवाडी, गजानन बंदुके, रमाकांत जोगेवार तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीचा रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्वयंचलितपणे नजर ठेवण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. एमएच ०४ एमएफ ४४३८ या क्रमांकाच्या वाहनावर ही प्रणाली बसविण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये उच्च दर्जाचे हाय रिझोल्युशन कॅमेरे, इन्फ्रारेड सेन्सर्स तसेच रडार प्रणाली बसविण्यात आली असून, त्यांच्या सहाय्याने रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक नियमभंगाची अचूक नोंद घेतली जाणार आहे. इन्फ्रारेड सेन्सर्सच्या माध्यमातून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे, सीट बेल्ट न वापरणे तसेच तिहेरी प्रवास (ट्रिपल सीट) करणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविली जाणार आहे. हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनांचे स्पष्ट छायाचित्र, वाहन क्रमांक व घटना स्थळाची नोंद घेतली जाणार असून, ही माहिती पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहे. तसेच रडार प्रणालीद्वारे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचा वेग अचूकपणे मोजून अतिवेगातील वाहनांची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे संकलित सर्व माहिती क्लाऊड आधारित प्रणालीवर पाठविण्यात येणार असून, त्यानुसार ई-चलन प्रणालीद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शक, अचूक व प्रभावी वाहतूक अंमलबजावणी शक्य होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी दिले. *****

No comments: