02 January, 2026
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग येथे पूजा, अभिषेक व दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा सुरू होणार
हिंगोली (जिमाका), दि. 02: हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक व पवित्र औंढा नागनाथ अष्टम ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांच्या सोयीसाठी पूजा, अभिषेक, दर्शन तसेच दानासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा लवकरच सुरू होणार आहे. या सुविधेमुळे देश-विदेशातील भाविकांना घरबसल्या भगवान शंकराची पूजा-अर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून, हजारो वर्षांपासून हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. पौराणिक कथेनुसार, दारुकावन येथे भगवान शंकराने राक्षसांचा संहार करून नागाच्या रूपात प्रकट झाल्याने या ज्योतिर्लिंगाला नागनाथ असे नाव प्राप्त झाले. औंढा नागनाथ हे भारतातील एकमेव भूमिगत ज्योतिर्लिंग आहे. येथे दरवर्षी 25 लाख भाविक भेट देतात. याची संख्या दुप्पट म्हणजे 50 लाख करण्यासाठी शासनाने औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनिवास, पार्कींग सुविधा, मुझियम, पार्क, लाईटींग यासह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 260 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला लवकरच उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन अंतिम करण्यात येणार आहे.
ऑनलाइन पूजा व अभिषेक सेवा : ऑनलाइन प्रणालीद्वारे भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाअभिषेक (पूर्ण विधी व वैदिक मंत्रोच्चारासह) रुद्राभिषेक, लघु अभिषेक व साधी पूजा, सकाळ व संध्याकाळ आरती बुकिंग, वर्षभराचे वेळापत्रक, दर्शनासाठी आगाऊ स्लॉट बुकिंग मंदिर विकासासाठी ऑनलाइन दानाचा यात समावेश आहे. ही ऑनलाइन सेवा शासनमान्य व प्रमाणित असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.
आगामी सण व उत्सव
15 फेब्रुवारी 2026 – महाशिवरात्री, (वर्षातील सर्वात महत्त्वाचा उत्सव), ऑगस्ट–सप्टेंबर 2026 – श्रावण महिना (प्रत्येक सोमवारी विशेष दर्शन) आणि 17 ऑगस्ट 2026 – नागपंचमी (नागदेवतेची विशेष पूजा) होते.
मंदिर विकासासाठी योगदानाचे आवाहन
मंदिराच्या संवर्धन, विकास व विविध सेवा उपक्रमांसाठी भाविकांनी ऑनलाइन दानाद्वारे योगदान द्यावे, असे आवाहन औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनाने केले आहे.
ऑनलाइन पूजा, अभिषेक, दर्शन बुकिंग व सविस्तर माहितीसाठी भाविकांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगच्या अधिकृत https://www.figma.com/proto/j5Cb4MCK0faWCB5QKFORrA/Responsive?node-id=1-4&t=51ZTrh34krARWPMu-0&scaling=min-zoom&content-scaling=fixed&page-id=0%3A1 या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच काही सूचना असल्यास त्या अवगत कराव्यात, असेही कळविण्यात आले आहे.
आपले सरकार सेवा केंद्राची निवड पारदर्शक करणार
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र करिता जाहिरात मागवून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील 423 व हिंगोली शहरातील 7 असे एकूण 430 आपले सेवा केंद्राची निवड करण्यात येणार आहे. ही निवड पारदर्शकपणे करण्यात येणार असून याबाबतच्या कोणत्याही अफवाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी केले.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.01.01.2026 पर्यत औंढा नागनाथ -375, वसमत – 437, हिंगोली-482, कळमनुरी -461 व सेनगाव -271 असे एकूण 2026 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज करण्याची आज शेवटची तारीख असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस पाटील पदभरती पारदर्शक होणार
पोलीस पाटील पदासाठी हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली 76, सेनगाव 65, कळमनुरी 89, वसमत 57 व औंढा नागनाथ 56 अशा एकूण 343 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी दि. 5 जानेवारी पर्यंत गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार असून दि. 6 ते 7 जानेवारी दरम्यान आक्षेप मागविण्यात येत आहेत. तर दि. 8 ते 10 जानेवारी, 2026 या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 12 ते 26 जानेवारी, 2026 या कालावधीत अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्जाची छाननी व प्रवेशपत्राचे वाटप दि. 27 ते 30 जानेवारी, 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. यासाठी लेखी परीक्षा दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी घेण्यात येणार आहे. त्याचा निकाल दि. 10 फेब्रुवारी, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 11 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना दि. 13 फेब्रुवारी, 2026 रोजी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.
ही पारदर्शक होणार असून याबाबतच्या कोणत्याही अफवाला, अमिषाला बळी पडू नये. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.
बालविवाहासाठी कार्यपद्धती निश्चित
बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा तयार करण्यासाठी बालविवाहासंबंधी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तसेच आता सर्वांना विवाह नोंदणी बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी जन्म तारखेचा दाखला व निर्गम उताराच ग्राह्य धरण्यात येणार आहे. वसमतमधील एका मंगलकार्यालयामध्ये बालविवाह झाल्याचे आढळून आल्यामुळे त्या मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली.
हिंगोली भारताची हळदीची राजधानी
देशामध्ये हळद उत्पादनामध्ये हिंगोली जिल्हा पहिला आहे. हिंगोली जिल्ह्यात 50 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. ही लागवड भारताच्या 15 टक्के इतकी आहे. त्यामुळे हिंगोलीला आता भारताची हळदीची राजधानी ठरली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिली.
जनता दरबार उपक्रम राबविणार
पुढील आठवड्यात पाच गावामध्ये जनता दरबार घेण्यात येणार आहे. या जनता दरबारात सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहे. या माध्यमातून जनतेच्या तक्रारी स्थानिक पातळीवर गावातच निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेतून प्रत्येक तालुक्यातील पाच याप्रमाणे टप्प्याटप्याने शिवस्ते, पाणंद रस्त्याची मोफत मोजणी, क्रमांक देऊन 15 फुटाचे पक्के रस्ते तयार करण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे रायल्टीही माफ करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली.
यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment