01 January, 2026

“सडक सुरक्षा-जीवन रक्षा” रस्ता सुरक्षा अभियानाचे हिंगोलीत उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि. 01 : रस्ता अपघातांना आळा घालण्यासाठी व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत “सडक सुरक्षा-जीवन रक्षा” या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दि. 01 जानेवारी 2026 रोजी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य राहुल गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले. त्यांनी “सडक सुरक्षा-जीवन रक्षा”या अभियानामागील उद्देश स्पष्ट करताना रस्ता अपघात रोखण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्याबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या भाषणात श्री. गावडे यांनी सांगितले की, रस्ता अपघातांमुळे अपघातग्रस्त कुटुंबाचे मोठे नुकसान होतेच, शिवाय देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे तीन टक्के इतकी आर्थिक हानी होते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहन चालवावे, वेगमर्यादा पाळावी, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विक्रांत बोयणे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अतुल बानापुरे, विकास नाईकवाडी, विक्रांत बोयणे, कार्यालयीन अधीक्षक संजय केंद्रे, वरिष्ठ लिपिक श्रीमती जयश्री वाघमारे, गणेश टाक, कैलाश भोरगे, कनिष्ठ लिपिक रमाकांत जोगेवार, गजानन बंदुके, मोतीराम पोकले तसेच श्रीमती पूजा मुदीराज, श्रीमती स्वाती गोपड आणि श्रीमती महानंदा बोधमवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. ******

No comments: