14 January, 2026
अस्वच्छ व्यवसायात कार्यरत पालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना; लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 14(जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अस्वच्छ व्यवसायात कार्यरत असलेल्या पालकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या एक मार्च 2021 च्या शासन निर्णयानुसार ही योजना अंमलात आणण्यात आली असून, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या सर्व जाती-धर्मातील इयत्ता पहिली ते १० वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती लागू आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा २२५ रुपयेप्रमाणे १० महिन्यांसाठी २,२५० रुपये तसेच वार्षिक तदर्थ अनुदान ७५० रुपये मिळून तीन हजार रुपये लाभार्थी देण्यात येणार आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ७०० प्रमाणे १० महिन्यांसाठी ७,००० रुपये तसेच वार्षिक तदर्थ अनुदान १,००० रुपये मिळून ८,००० प्रति लाभार्थी देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पात्रतेच्या अटींमध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अॅक्ट, २०१३ मधील सेक्शन २(1)(d) नुसार धोकादायक सफाई व्यवसायात काम करणारे पालक, हाताने मेहतर काम करणारे, मानवी विष्ठा वहन करणारे, उघड्या गटारांची साफसफाई करणारे, परंपरेने अस्वच्छ व्यवसायाशी संबंधित सफाईगार, कातडी कमावणारे, कातडी सोलणारे तसेच कचरा गोळा करणे व उचलण्याचे काम करणारे पालक यांचा समावेश आहे. या योजनेसाठी सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी पात्र राहतील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अस्वच्छ व्यवसाय करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, ग्रामपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांनी ग्रामसेवक व सरपंच, तर नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment