14 November, 2017

पुस्तके आपणांस ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात
                                                -- आसाराम लोमटे
·   हिंगोली ग्रंथोत्‍सव 2017’ चे उद्घाटन
        हिंगोली,दि.14:  प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तके हि आपणांस ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.
            हिंगोली नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित ‘हिंगोली ग्रंथोत्‍सव- 2017’ च्या उद्घाटन प्रसंगी श्री. लोमटे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बघाटे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. लोमटे पुढे म्हणाले की, वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजतात कळतात. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे ‘पुस्तक’ होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्व आहे. ज्या देशांनी संस्कृतींनी ग्रंथांचे, ज्ञानाचे महत्व ओळखले त्या देशांची भरभराट झाली. त्या देशांचा, त्या भागाचा विकास संतुलित पद्धतीने झाल्याचे आपणांस दिसून येते. ग्रंथ वाचनाने आपण सतत समृद्ध होत असतो. पुस्तकामुळे बाहेरील नविन जगाची ओळख होते. या ग्रंथामुळे अनेकांना ओळख मिळाली आहे.
            वाचन ही एकच अशी गोष्ट आहे की त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो. ज्ञानामुळेच आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. यासाठी आपण स्वतःला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा असून त्याची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होत असते. यावेळी  ‘टॉर्च’ ही कविताही श्री. लोमटे यांनी सादर केली.
            जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे म्हणाल्या, चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ग्रंथ, पुस्तके आपणांस जीवनात नक्कीच उपयुक्त ठरतात. ते आपले खरे व निस्वार्थी मार्गदर्शक असतात.
            श्री. गाडेकर यावेळी म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ व साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे ग्रंथ आपल्या दारी आले आहेत. जे लोक ग्रंथांना महत्व देतात, ग्रंथांच्या सहवासात असतात त्यांच्या जीवनात नक्कीच अमुलाग्र बदल होतो.
            उपशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे म्हणाले, ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ग्रंथांची आवड लावली पाहिजे. यातूनच संपन्न व्यक्तीमत्व घडू शकते. सामान्य ज्ञान, माहितीसाठीही पुस्तकवाचन महत्वपूर्ण असून वाचन संस्कृतीचा अधिक प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे.
             प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव सुभाष साबळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कमी होत चाललेल्या वाचनसंस्कृती वाढविण्याकरीता या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
            प्रारंभी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांना ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुधीर वाघ यांनी तर प्रमोद पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रंथदिंडी
            ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ‘ग्रंथोत्सव-2017’ निमित्त येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशाला ते कल्याण मंडपम् पर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीत पालखी मध्ये ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ ठेवण्यात आला होता. यावेळी ग्रंथदिंडीत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
            ‘ग्रंथोत्सव-2017’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनीचे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती.
*****


No comments: