10 November, 2017

पन्नास टक्के अनुदानावर गहू, हरभरा बियाणे वाटपासाठी उपलब्ध
हिंगोली, दि. 10 :  राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात 50 टक्के अनुदानावर हरभरा (15 वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले आहे. ‘महाबीज’ मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने उपअभियान हा घटक राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे हरभरा बियाणे 60 टक्के किंवा 4 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल, तसेच गहू बियाणे 50 टक्के किंवा 1 हजार 600 रुपये प्रति क्विंटल, याप्रमाणे जे कमी असेल ते अनुदानित दराने शेतकऱ्यांना परमीटव्दारे दिले जाईल. जवळच्या महाबीज वितरकाकडे पुरवठा केला जाईल. एका शेतकऱ्यास एक एकर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ दिला जाईल. गावाची व लाभार्थ्यांची निवड कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून केली जाईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे बियाणे खरेदी करण्याचे परमीट दिले जाईल.
निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यानी सात-बारा उतारा, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे सादर करून परमीट घ्यावे. त्यात सर्वसाधारण प्रवर्ग 35 टक्के, अनुसूचित जाती प्रवर्ग 35 टक्के आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग 30 टक्के याप्रमाणे निवड करण्यात येईल.
हरभरा बियाणेसाठी तालुकानिहाय नियोजनाची आकडेवारी क्विंटलमध्ये : हिंगोली - 125, कळमनुरी - 129, वसमत - 125, औंढा नागनाथ - 125, सेनगांव - 125 एकूण 629 तसेच गहु बियाणे क्विंटलमध्ये : हिंगोली - 109, कळमनुरी - 106, वसमत - 106, औंढा नागनाथ - 106, सेनगांव - 106 एकूण 533 उर्वरित बियाण्याची उचल करावी. अधिक माहिती व परमीटसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: