15 November, 2017

ग्रंथ वाचनातून जीवनास अर्थ प्राप्त होतो
                                                                                                                   -- प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण

          हिंगोली, दि. 15: नियमित  वाचनाने विचार, ज्ञान आणि व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. संतुलित विचार करण्याचे सामर्थ्यही वाचनामुळेच प्राप्त होते. एवढेच नाही तर वाचनामुळे जीवनास खरा अर्थ प्राप्त होतो असल्याचे  प्रतिपादन प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले.    
            हिंगोली नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित ‘हिंगोली ग्रंथोत्‍सव- 2017’ च्या दूसऱ्या दिवशी ‘ग्रंथाने काय दिले’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चव्हाण बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. कुमार भालेराव, प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव, पंडित अवचार, श्रीमती आरती मार्डीकर यांनी सहभाग नोंदविला होता.
            प्रा. डॉ. चव्हाण म्हणाले की, पुस्तके हे आपणांस सकारात्मक विचार देत असतात. मानवी जीवन आणि संस्कृतीच्या विकासासाठी विचार व ज्ञान या दोन्हीची गरज असते. समाजाची उंची ही त्या ज्ञानावर अवलंबून असते. परंतू यासाठी नियमित ग्रंथ वाचनाची सवय आवश्यक आहे. वाचनाचा आस्वाद हा खऱ्या अर्थाने ग्रंथातूनच प्राप्त होतो. एक ग्रंथ जितक्या वेळेस वाचला तितक्या वेळेस त्या ग्रंथातून आपणांस नव-नवीन माहिती मिळते असते.
            अलिकडच्या काळात ज्ञान मिळविण्याचे मार्ग बदललेले आहेत. ज्ञान सहज उपलब्ध होत आहे अशावेळी आपणही काळानुसार बदलले पाहिजे. असे असले तरी ग्रंथांचे महत्त्व संपत नाही. ग्रंथ वाचण्याचा एक वेगळा आनंद असतो. ग्रंथामुळे इतिहास समजला जातो. ज्ञानार्जनासाठी पुस्तके वाचली पाहिजेत. ग्रंथांमुळे आपल्याला दु:खातून बाहेर पडण्याची आणि आयुष्यात संघर्ष करुन पुढे जाण्याची ताकद मिळते. पुस्तकांमुळे आपल्याला एखाद्या ठिकाणी न जाताही तेथील अनुभव घेता येतो. म्हणून आपण सर्वांनी पुस्तकावर प्रेम केले पाहिजे असे ही प्रा. डॉ. चव्हाण यावेळी म्हणाले.
            यावेळी प्रा. डॉ. कुमार भालेराव, प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव, पंडित अवचार, श्रीमती आरती मार्डीकर यांनी हि ‘ग्रंथाने काय दिले’ या विषयावर समयोचित मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


*****

No comments: