22 June, 2018


बँकांनी उद्दिष्टानुसार पीक कर्ज वितरण पूर्ण करावे
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली,दि.22: जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना           बि-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत देण्यात येते. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वितरण करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांनी आपल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मार्च तिमाही अखेरची जिल्हा समन्वय समितीची आणि पीक कर्ज आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकांचे नोडल अधिकारी आणि भारतीय स्टेट बँकेच्या ज्या शाखांचे कर्ज वाटप कमी आहे, त्या बँकांचे शाखाधिकारी उपस्थित होते.
पिक कर्ज वितरणाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले,  जिल्ह्यात एकूण 9 हजार 402 शेतकऱ्यांना 47.53 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या केवळ 5 टक्के पिक कर्जाचे वाटप झाले असून बँकांनी शेतकऱ्यांप्रती सहानूभुती दाखवावी. पीक कर्ज वितरणाची गती वाढवावी.  जिल्ह्यातील सर्व बँकांनी सर्व उपस्थित शाखाधिकाऱ्यांना पिक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात-लवकर जून 2018 अखेर पुर्ण करावे.
या बैठकीमध्ये पिक कर्जाव्यतिरिक्त priority क्षेत्र वाटप (mudra), कर्जमाफी वाटप आणि कर्जमाफी झालेल्या लोकांना दिलेले नवीन पिक कर्ज वाटप याचा आढावा घेण्यात आला. दरम्यान 1 एप्रिल 2018 पासुन जिल्ह्यात एकूण 4 हजार 745 सभासदांना 17.13 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी बँकांची ठेवी आणि कर्ज अनुपात याचा आढावा घेतला. ज्यांच्या ठेवी जास्त आणि कर्ज वाटप कमी अशा बँकांना कर्ज वाटप वाढविण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्ह्यातील विविध विकास महामंडळांनी बँकांना दिलेल्या 2017-18 साठीच्या उद्दिष्ट पुर्तीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांकांना होणाऱ्या कर्ज वाटपाचा देखील आढावा बैठकीमध्ये घेतला. यावेळी बँकांचे प्रतिनिधी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments: