26 June, 2018




राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण
                                                 -- शिवराणीताई नरवाडे

                                                      ·  सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

हिंगोली, दि.26 : देशाच्या व्यवस्थेला बदलविण्यात आणि सामाजिक क्रांतीला महाराष्ट्रातील शाहू- फुले-आंबेडकरांनी त्यावेळीच सुरुवात केली. मागास व वंचित घटकातील लोक शिकून पुढे गेले पाहिजेत ही शाहू महाराजांची भूमिका होती. त्याकाळात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अमुलाग्र सुधारणा घडवून आणण्यात राजर्षी शाहू महाराजांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे यांनी केले.
26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण विभाग कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार राजीव सातव, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बी. एस. केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती नरवाडे म्हणाल्या की, आर्थिक विकासासह सामाजिक आणि शैक्षणिक विकास होण्याची आज आवश्यकता आहे. अन्याय करणे जसा गुन्हा आहे, तसाच अन्याय सहन करणे देखील गुन्हाच आहे. याकरीता समाजाने देखील जागृत होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या आसपासच्या नागरिकांना जाती-पाती विरहीत समानतेची वागणुक दिली पाहिजे. समाज सुधारणांच्या कामासाठी या थोर समाज सुधारकांनी पुढाकार घेतला. त्यांचा समतेचा संदेश सर्वसामान्यपर्यंत गेला पाहिजे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरिती बंद झाल्या पाहिजेत. शाहू महाराजांनी मानव मुक्तीच्या दृष्टीने काम केले असल्याचेही श्रीमती नरवाडे यावेळी म्हणाल्या.
खासदार राजीव सातव म्हणाले की, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले. मानवता आणि समाजवादी राजा म्हणून राजर्षी शाहू महारजांची वेगळी ओळख आहे.
आमदार श्री. वडकुते यावेळी म्हणाले की, शाहू-फुले-आंबेडकरांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणुन त्यांना न्याय देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात त्यांच्या करवीर संस्थानातून केली. शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे अत्यंत मौल्यवान दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केल्यामुळे मागास आणि वंचित घटकातील लोकांना उच्च शिक्षण घेता आले, महत्वाच्या पदावर काम करता आले. आरक्षणामुळे सामाजिक प्रगती होत असल्याचे ही यावेळी श्री. वडकुते यांनी सांगितले.
सामाजिक उत्थानाची प्रक्रिया ही शाहू-फुले-आंबेडकर या थोर समाज सुधारकामुळेच सुरु झाल्याचे सांगत जिल्हाधिकरी अनिल भंडारी पुढे म्हणाले की, या समाजसुधारकांनी विशिष्ट जातीच्या विकासासाठी काम केले नसून त्यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी काम केले आहे. शाहू महाराजांनी वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम आरक्षणाची सुरुवात केली.  सामाजिक न्याय विभाग समाजातील विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. ज्या मुलांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांना निवासाच्या दृष्टीने वसतीगृहाची व्यवस्था यासह अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.

            समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत-जास्त व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्ह्यातील आश्रम शाळा, वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.

            कार्यक्रमाला जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा, वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनी, पत्रकार, महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****


No comments: