22 June, 2018

भारत सरकार शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेले अर्ज सादर करण्याचे आवाहन


भारत सरकार शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेले अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतने इत्यादी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महाडिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्यामुळे सन 2017-18 या आर्थिक वर्षातील प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्विकारून अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्रथम प्रवेश विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज, बि-स्टेटमेंटसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्याचे व नुतनीकरणाचे अर्ज स्कॉलरशिप पोर्टलवर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तथापि जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज, बि-स्टेटमेंटसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय हिंगोली येथे अद्यापही सादर केले नाही. तसेच काही महाविद्यालयाने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अर्जाचे नुतनीकरण केले नाही. या संदर्भात महाविद्यालयास वेळोवेळी पत्राव्दारे व दूरध्वनीव्दारे सुचना देऊनही काही महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर आहे.
तरी याव्दारे पुनश्च एकदा हिंगोली जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, आपल्या स्तरावर असलेले सन 2017-18 चे प्रथम प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज, बि-स्टेटमेंट आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव दि. 30 जून, 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयास सादर करण्यात यावे, अन्यथा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिल्यास तसेच भविष्यात सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास यास सर्वस्वी महाविद्यालय जबाबदार राहील, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****

No comments: