06 June, 2018

मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -- वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार


मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
                                                                -- वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार

        हिंगोली,दि.06: औंढा नागनाथ हे जिल्ह्यातील नव्हे तर राज्य आणि देशातील महत्वाचे तिर्थक्षेत्र असून, या गावचा विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार औंढा नागनाथ गावच्या विकासाकरीता 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून, औंढा नागनाथ नाहीतर संपूर्ण मराठवाड्याच्या कोणत्याही विकास कामासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी केले.
            औंढा येथील वैशिष्ट्यपूर्ण योजना व नवीन नगर पंचायत योजना अंतर्गत विविध कामांचे भूमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी वित्त मंत्री मुनगंटीवार हे बोलत होते. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्षा दिपालीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी वित्त मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. परंतू या गावचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. याठिकाणी भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतू त्यांना किंवा येथील स्थानिक नागरिकांना पाहिजे तशा मुलभूत सुविधांचा येथे विकास झाला नाही. याकरीता औंढा नागनाथ गावच्या विकासासाठी बारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून, याद्वारे गुणवत्तापुर्ण विकास कामे करण्यात यावी. तसेच होणाऱ्या विकास कामांवार स्थानिक नागरिकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. औंढा नागनाथ तिर्थक्षेत्राचा असा विकास करा की, येथे येणाऱ्या प्रत्येक भाविक-पर्यटकांना येथील आठवण कायम राहिली पाहिजे. औंढा नागनाथ गावचा विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. येणाऱ्या वर्षात औंढा नागनाथच्या सर्वागिंण विकासासाठी आणखी 15 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
            पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, औंढा नागनाथ हे पवित्र तीर्थक्षेत्र असून, तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीकोनातून विकास करण्यात येणार आहे. याकरीता येथील विकास कामे करण्यासाठी योग्य नियोजन करावे. येथील पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला असून नागरिकांना स्वच्छ व फिल्टरचे पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत 13 कोटी तर राष्ट्रीय पेयजल योजने अंतंर्गत 39 कोटी रुपये असा एकुण 136 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेतंर्गत जिल्ह्यास उपलब्ध करुन दिला. राज्यावर 3 लाख 52 हजार कोटीचे कर्ज असतांना 2012 साली दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणुन राज्य शासनाने 8 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. तर दूसऱ्या वर्षी 5 हजार कोटी नुकसानाची भरपाई म्हणुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आज राज्यावर साडेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज असतांना महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी अडीच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. तर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सातशे कोटी रुपये राज्याला उपलब्ध झाले.
            मराठवाड्यात दरवर्षी चार ते साडेचार हजार टँकरद्वारे पाणी पूरवठा करावा लागत होता. गुजरात, तेलंगना आणि श्रीलंका येथे वॉटर ग्रीडचा अभ्यास करुन, मराठवाड्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी वॉटर ग्रीड संकल्पना इस्त्रायल सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. यामुळे पिण्यासाठी, उद्योग आणि शेतीला या वॉटर ग्रीडमुळे पाणी मिळणार असल्याचेही श्री. लोणीकर यावेळी म्हणाले.
            औंढा नागनाथ शहराचा अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासकामांचा शुभारंभ आज झाला असल्याचे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांना सर्व सोयी-सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून शासन प्रयत्न करीत आहे. याकरीता मागील तीन वर्षापासून विविध योजनाच्या माध्यमांतून जिल्ह्याचा सर्वागिंण विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वांना बरोबर घेवुनच जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास करण्यास शासन प्राधान्य देत आहे.
            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण योजना व नवीन नगर पंचायत योजना अंतर्गत विविध कामांचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
*****

No comments: