24 January, 2020



प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करणे आवश्यक
-          जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली,दि.24: लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ निमित्त्‍ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी राजु नंदकर, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, तहसिलदार श्री. खंडागळे, पोलीस निरिक्षक श्रीमनवार आणि श्री. सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
श्री. जयवंशी म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकांस निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. यामध्ये स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळाले आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून याची जाणिव झाल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही. शासनाकडून आपण ज्या अपेक्षा करत असतो, त्यांची पूर्ततेसाठी आपण मतदान करणे हे कर्तव्य ठरते. याकरीता राज्यघटनेने दिलेला हा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या एका मतामुळे काय फरक पडणार, असा विचार करुन अनेक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत नाही. पण आपल्या एका मताने ही फरक पडू शकतो, हे लक्षात घेतले, तर मतदानाचे महत्व सर्वांना कळेल. देशात सशक्त लोकशाही हवी असेल, तर मतदानाशिवाय पर्याय नाही. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. याकरीता 18 ते 20 वयोगटातील युवकांनी पुढाकार घेवून आपली मतदार नोंदणी करावी. तसेच याबाबत समाजमध्ये जनजागृती ही करावी.
निवडणूकीमध्ये बीएलओ (बुथ लेवल ऑफिसर) हे अत्यंत महत्वाचा भाग असून यांच्याशिवाय निवडणुक प्रक्रिया यशस्वी पार पाडणे शक्य नाही. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी हे बीएलओच उपलब्ध करुन देतात. सद्या भारत निवडणुक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम बीएलोमार्फत राबविण्याची मोहिम हाती घेतली असून 13 फेब्रूवारी 2020 पर्यंत ही पडताळणी होणार आहे. आपल्या जिल्ह्यातील बीएलओंनी आतापर्यंत 69 टक्के पडताळणीचे काम पूर्ण केले असून याबाबतीत आपला जिल्हा राज्यात प्रथम असून हे फक्त बीएलओमुळे शक्य झाले आहे. याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या बीएलओंचा आज सत्कार करण्यात येणार असून त्यांचे मी अभिनंदन करतो असे जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगाबाबत मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिणियार म्हणाले की, 25 जानेवारी, 1950 निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकीविषयक सर्व कामकाज निवडणूक आयोग करते. तीन सदस्यी निवडणूक आयोगाची रचना आहे. मतदार याद्या तयार करणे, मतदारांची पडताळणी करणे, मतदार ओळख पत्र देणे, अचारसंहिता लागू करणे, नामाकंन, नामाकंनाची छाननी, मतदान घेणे, मतमोजणी करणे, निवणुक निकाल जाहिर करणे ही महत्वाची  कार्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात येतात.
तर भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगर पालिका, नगर परिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. संविधानातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन’ याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असल्याची माहिती दिली.
तसेच 18 ते 20 वयोगटातील युवकांनी आपली मतदार नोंदणी करण्याची आवाहन करत Voter Helpline या मोबाईल ॲपद्वारे देखील मतदार नोंदणी करता येते अशी माहिती श्री. मिणियार यांनी यावेळी दिली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर प्रास्ताविकात म्हणाले की, 25 जानेवारी 1950 रोजी आयोगाची स्थापना झाल्याने सन 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा केला जातो. नुकत्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या.  तसेच सद्या आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार पडताळणी कार्यक्रमात आपला जिल्हा राज्यात प्रथम आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत उल्लेखनीय कार्य केलेले बीएलओ यु. एन. तोरकड, प्रताप दशरथे, एस. डी. भस्के, एस. पी. बनसोडे, एस. बी. टेहरे, एस. जी. माहोरे, वाय. सी. पारसकर, व्ही. यु. हलगे, एस. एन. नाईक, एस.टी. रामदिनेवार, एस. एस. रामोड, आर. एच. वाठोरे, जी. बी. पायघन, ए. वाय. बिल्लारी, जी. आर. क्षिरसागर आणि गजानन नायकवाल यांचा यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.गायत्री वाकडे, कु. कांचन वाकडे यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच नवमतदारांना यावेळी प्रातिनीधीक स्वरुपात मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मतदानाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी कार्यक्रमात शाहीर श्री. दांडेकर यांनी सादर केलेल्या मतदार जनजागृतीपर गीतांनी कार्यक्रमात बहार आणली.
कार्यक्रमास यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, बीएलओ, प्राध्यापक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश येवले यांनी केले तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी आभार मानले.

****


No comments: