17 February, 2021

हिंगोली जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ

 





 हिंगोली  जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण

बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ

 

हिंगोली, (जिमाका) दि. 17: केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

या बहुमाध्यम रथाचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नांदेड चे प्रचार अधिकारी माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, सह जिल्हा निबंधक संजय पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून उद्घाटन केले.

या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विठ्ठल काटे आणि संच बीड यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत , शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य  कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे.  तसेच एलईडी डिस्प्ले च्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत.  श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.

पुढील दहा दिवस हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी , वसमत व औंढा नाथनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे नांदेडचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले.

0000

No comments: