24 February, 2021

लग्न समारंभास पूर्व परवानगी आवश्यक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतअसल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अगत्याचे झाले आहे.

त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लग्न समारंभास बंदी घालण्यात येत आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी संबंधितानी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य राहील. अन्यथा पूर्व परवानगी न घेता लग्न समारंभाचे आयोजन केल्यास वधूपक्ष व वर पक्षातील सर्व नागरिकांविरुद्ध कोरोनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच परवानगी नसताना देखील लग्न समारंभाचे आयोजन केल्यास संबंधित लॉन्स / मंगल कार्यालय चालकांविरुद्ध गुन्हा नोंद करुन लॉन्स / मंगल कार्यालय सील करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

VRRT पथकाने परवानगी न घेता आयोजित केल्या जाणाऱ्या लग्न समारंभाविषयी स्थानिक तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत तसेच पोलीस विभागास तात्काळ अवगत करावे. त्यानुसार संबंधितांवर कार्यवाही करण्याची व या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी हिंगोली जिल्हा, सर्व तहसीलदार हिंगोली जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधीत विभाग प्रमुख यांची असेल. त्यानुसार या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७यानुसार अपराध केला असे मानण्यात येऊन संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असेही आदेशात नमूद केले आहे.

******

No comments: