18 February, 2021

निर्यात योग्य व उच्च प्रतीच्या हळदीची निर्मिती करावी -- विपणन स्पाईस बोर्डाचे संचालक पी.एम. सुरेशकुमार

 


 

            हिंगोली, (जिमाका) दि. 18 : हिंगोली जिल्ह्यातील हळदीला ‍निर्यातीसाठी फार मोठा वाव असून अधिक कुरकुमीन असणाऱ्या निर्यात योग्य व उच्च प्रतीच्या हळदीची निर्मिती करावी, असे आवाहन विपणन स्पाईस बोर्डाचे संचालक पी.एम.सुरेशकुमार यांनी  उद्घाटनपर भाषणात केले.

स्पाईस बोर्ड भारत सरकार व  कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 फेब्रुवारी 2021 वार मंगळवार रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेमध्ये ऑनलाईन स्वरुपात वेबेल्स्, शेकरु, किसान नेट, फेसबुक व युट्यूब या माध्यमाद्वारे कृषी विज्ञान केंद्रामध्ये राष्ट्रीय हळद खरेदीदार-विक्रेता संमेलन पार पडले. यावेळी ते बोलत  होते.

या ऑनलाईन संमेलनात मार्गदर्शन करताना  परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार  शिक्षण संचालक डॉ.डी.बी.देवसरकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर मार्फत शुध्द हळद बियाण्याची निर्मिती करुन शास्त्रशुध्द लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असे सांगितले. मुंबई स्पाईस बोर्डाचे उपसंचालक बी. एन. झा यांनी हळद पावडर निर्यातीस संधी असून  हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपनीने हळद प्रक्रिया उद्योग गावोगाव स्थापन करुन निर्यात करावे, असे सांगितले. फलोत्पादन कृषी विभागाचे संचालक श्री. जमदाडे यांनी याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन विक्रेता व खरेदीदारांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

तसेच दत्तगुरु शेतकरी उत्पादक कंपनी कळमनुरीचे गंगाधर श्रृंगारे यांनी उच्च कुरकुमीन असणाऱ्या व कमी कालावधीत येणाऱ्या हळद वाणांची लागवड करुन उच्च प्रतीचा माल निर्यातदारास पुरवठा करण्याची हमी दिली. तर वसमत येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रल्हाद बोरगड यांनी शेतकरी गट व कंपनींच्या माध्यमातून सेंद्रीय हळदीचे उत्पादन घेत असून खरेदीदारांना उच्च प्रतीचा माल वर्षभर पुरविण्याची ग्वाही दिली.

या ऑनलाईन संमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर मार्गदर्शनामध्ये तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.पी.पी.शेळके यांनी हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना देशांतर्गत व देशा बाहेरील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.

या संमेलनाला  हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, खरेदीदार व निर्यातदार यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.राजेश भालेराव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल ओळंबे, प्रा.रोहीणी शिंदे, डॉ. कैलास गिते व ईतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

******

 

No comments: