02 February, 2021

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती

 


हिंगोली, दि. 02 (जिमाका) : मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षासोबत पंधरवाडा साजरा करण्यात येतो.

मोटार वाहन अधिनियम-1988 च्या कलम 129 मध्ये नमूद केल्यानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. तसेच वेळोवेळी मा. उच्च न्यायालय, मा. सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याचा निर्णय दिला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी जे दुचाकी वाहनाचा वापर करतात. त्यांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 अन्वये वाहन चालवित असतांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे. या आदेशानंतर शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणामध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास तो अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. याचे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे .

हिंगोली  शहर व जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे आदेश          दि. 1 फेब्रुवारी, 2021 पासून लागू राहतील. 

                                                                        ******

No comments: