04 February, 2021

रेशीम उद्योगातून 40 शेतकऱ्यांनी कमावले दिड लाखाच्या वर उत्पन्न रेशीम शेतीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली दि. 04 (जिमाका) : कोरोना सारखी महामारी असतांना जवळ जवळ सर्व पिकांचे भाव पडले होते. त्यावेळी शेतकरी चिंतेत होता. मध्येच पिक काढायच्या वेळी अतिवृष्टी होऊन हातात आलेले पिक वाया गेले. अशावेळी रेशीम शेतकरी मात्र ताठ उभा राहीला असून अतिशय हालाकीची परिस्थिती असताना सन 2020-2021 मध्ये जिल्ह्यातील जवळपास 40 च्या वर शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातून दिड लाखाच्यावर उत्पन्न घेत आहेत. तसेच 100 शेतकरी एक लाखाच्या जवळ उत्पन्न घेत असून अजूनही त्यांचे उत्पन्न वाढत आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीने आधार दिला असून बरेच शेतकरी उत्पन्न घेऊन समाधान व्यक्त करीत आहेत. त्यापैकी महारी बु. चे प्रगतशील शेतकरी मेहबुब शेख, बोराळाचे सुनिल मोरे, शिवाजी नायक इत्यादी शेतकऱ्यांनी उत्पन्नाबाबत समाधान व्यक्त केले आहे. यावेळी प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे, पि.ए.चव्हाण, रमेश भवर, शिलवंत इंगोले, रंगनाथ जांबुतकर उपस्थित होते.

            रेशीम उद्योगामध्ये मनरेगा तसेच नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना या दोन योजना असून मनरेगातून 33 वर्षामध्ये एकूण 03 लाख 26 हजार रुपये इतकी रक्कम कुशल-अकुशलच्या स्वरुपात प्रत्येक शेतकऱ्यांना प्रती एकरी दिली जाते. यामध्ये तुती नर्सरी तसेच किटक संगोपनगृह सर्व असून या शेतीपूरक व्यवसायाची नोंद प्रत्येक शेतकऱ्यांने करुन स्वत:चे उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सध्या जिल्ह्यात दि. 25 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत महारेशीम अभियान चालू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी दि. 15 फेब्रुवारी, 2021 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी केले आहे.

*****

No comments: