12 February, 2021

हळद खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन शेतकऱ्यांनी नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन

 


 

हिंगोली, दि. 12 (जिमाका) : केव्हीके तोंडापूर ता. कळमनुरी आणि स्पाईसेस बोर्ड भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 वाजे दरम्यान ऑनलाईन पध्दतीने हळद खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  हे संपूर्ण संमेलन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले असून देशभरातील सुमारे 300 निर्यातदार यामध्ये निमंत्रित करण्यात आलेले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या हळदीचे खरेदीदार त्याचप्रमाणे सामान्य नागरिक यांना या कार्यक्रमामध्ये नोंदणी करुन सहभागी होता येईल. नोंदणीसाठी केव्हीकेच्या फेसबूक पेजवर लिंक देण्यात आलेली आहे. जे विक्रेते किंवा शेतकरी नोंदणी करतील त्यांना त्वरित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेबेक्स लिंक देण्यात येईल. सहभागी होण्यास ईच्छूक व्यक्तींनी आपल्या मोबाईल फोनवर वेबेक्स  नावाचे ॲप डाऊनलोड करुन ठेवावे.

                या कार्यक्रमाचे उद्घाटन स्पाईसेस बोर्ड, भारत सरकार यांचे विपणन संचालक पी. एम. सुरेशकुमार हे करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली येथील संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ॲड.‍ शिवाजीराव माने हे राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे विस्तार  शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, स्पाईसेस बोर्ड मुंबईचे उपसंचालक बी. एन. झा, वसमत बाजार समितीचे सभापती राजू पाटील इंगोले, उमरा येथील गजानन मार्केटचे अमीत ओमप्रकाश हेडा, कळमनुरी येथील दत्त गुरु शेतकरी उत्पादक कंपनीचे गंगाधर श्रंगारे, वसमत येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड, त्याचप्रमाणे श्री. मोटे, संचालक, उद्यानविद्या, ॲग्री विभाग, महाराष्ट्र शासन हे राहणार आहेत.

           तज्ञांचे मार्गदर्शन संपल्यानंतर हळदीचे खरेदीदार आणि विक्रेते यांची आपापसात ऑनलाईन चर्चा आयोजित केली जाईल. त्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष खरेदी भविष्यात निश्चित होईल. या उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव त्याचप्रमाणे निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे.

           या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण किसान ॲपद्वारे, शेकरु टी व्ही द्वारे तसेच केव्हीकेच्या फेसबूक  आणि युटयूब चॅनलवर उपलब्ध करुन देण्यात येणार. याचा सुध्दा शेतक-यांनी लाभ घ्यावा.

याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी करुन संमेलनात भाग घ्यावा, असे आवाहन डॉ. पी. पी. शेळके, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, केव्हीके, तोंडापूर ता. कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: