10 July, 2021

 




पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, इंटेन्सिव पेडियाट्रिक केअर युनिट, एआरटी केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

 

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे

                                          - पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

 

* एच.आय.व्ही. रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआरटी केंद्राची उभारणी

* हिंगोली येथे भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले एआरटी केंद्र 

 

हिंगोली,दि. 10(जिमाका) :  कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ऑक्सिजन, प्रकल्प, लेव्हल तीनचे इंटेन्सिव पेडियाट्रिक युनिट व 20 खाटांचे एन.आय.सी.यू., व्हेंटीलेंटर्स यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनी तिसऱ्या लाटेचा शिरकाव हिंगोली जिल्ह्यात होणार नाही यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या.

येथील जिल्हा रुग्णालयातील 1050 प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, पेडियाट्रिक इंटेन्सिव केअर युनिट, 50 खाटांच्या पीआयसीयू केंद्राचे तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष आणि एआरटी औषधोपचार केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी यावेळी विषाणू संशोधन आणि प्रयोगशाळा आणि डी.ई.आय.सी. विभागाची ही पाहणी केली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी  आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या अथक प्रयत्नामुळेच कोरोनोला रोखण्यात यश आले आहे. भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठीही सर्वांनी असेच चांगले काम करावे यासाठी शुभेच्छा देवून हिंगोलीचा पॅटर्न राज्यात आणि देशात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केल्या. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची बाधा लहान मुलांना होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा व डेल्टा, डेल्टा प्लस या विषाणूंचा जिल्ह्यात होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागांनी योग्य नियोजन करुन दक्षता घेण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 कोटी रुपये किमंतीचे 1050 लिटर प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला आहे. याद्वारे 100 रुग्णांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी वार्ड तयार करण्यात आला आहे.

तसेच कोरानाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून 1 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन 50  बेड्चे अत्याधुनिक व्हेंटीलेटरयुक्त (PICU) बाल रुग्ण अतिदक्षता केंद्र तयार करण्यात आले आहे. या अतिदक्षता केंद्रात ऑक्सिजन लाईन, कम्प्रेसड एअर लाईन आणि सक्शन लाईनची सुविधा उपलब्ध करुन सदर कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये 300 ग्रॅम वजनाच्या बालकापासून ते वयस्क व्यक्तींवर उपचार करण्याची क्षमता या केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्रात 25 अत्याधुनिक व्हेंटीलेटरयुक्त बेड्स आणि व्हेंटीलेटरी आवश्यकता नसणारे परंतु गंभीर आजार असणारे व ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी 25 बेड्स आयसीयू वार्ड तयार करण्यात आले असून यामध्ये सर्वोत्कृष्ट उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. तसेच या (PICU) बाल रुग्ण अतिदक्षता केंद्रासाठी 200 लिटर प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला असुन क्रायो ऑक्सिजन टँन्क मार्फत सुध्दा ऑक्सिजन पुरविले जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एड्स सारख्या रुग्णांसाठी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार  जिल्हा नियोजनातून 1 कोटी 63 लक्ष किंमतीचे स्वतंत्र एआरटी केंद्र उभारण्यात आले आहे. भारतात असे एकूण 3 एआरटी केंद्र असून महाराष्ट्रात हिंगोली येथे उभारण्यात आलेले पहिले एआरटी केंद्र आहे. या केंद्रात एच.आय.व्ही. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

भविष्यात कोरोनाची तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे 4 प्लॉन्ट लवकरच उभारण्यात येणार आहेत. हे प्लॉन्ट उभारण्यासाठी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन मधून 6 कोटी निधी उपलब्ध होणार आहे. याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय हिंगोली आणि उप जिल्हा रुग्णालय वसमत येथे 20 के.एल. क्षमतेचे क्रायो ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार आहेत.

तसेच सर्व तालुक्याच्या ठिकाणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णांची तसेच नवजात शिशु आणि मुलांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि इतर सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. येणाऱ्या 1 महिन्याच्या आत भविष्यात जन आरोग्याच्या बाबतीत येणाऱ्या कोणत्याही आवाहनांचा मुकाबला करण्यासाठी हिंगोली जिल्हा सक्षम होणार आहे, अशी माहितीही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                                                                        ****

No comments: