09 July, 2021

 

खरीप हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी  योग्य नियोजन करावे

- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 

हिंगोली, (जिमाका) दि. 09 : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेवून खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके आदी कृषि निविष्ठा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.  

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषि विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. यावेळी सर्वश्री आ. तान्हाजी मुळकुळे, राजु नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता तपासून पेरणीबाबत तांत्रिक तपशील समजेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत पोहचवावा. तसेच शासनाने तयार केलेल्या सोयाबीन लागवडीच्या चतु:सुत्री कार्यक्रमाची  माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. खते व बियाणे शेतकऱ्यांना योग्य दरात व योग्य वेळी उपलब्ध होतील यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी. खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांना पिककर्ज वितरण व पिक विम्याचा लवकरात-लवकर लाभ उपलब्ध करुन द्यावा.

यावेळी बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिक परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर केला.

****

No comments: