29 July, 2021


 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कामकाजाचा आढावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक दि. 27 जुलै, 2021 रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा बाल सरंक्षण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

या बैठकीमध्ये सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी कक्षाने राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य व सदस्य सचिवांना दिलेले प्रशिक्षण तसेच कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी तसेच जिल्ह्यातील बालगृह आणि त्यातील बालकांची कोविड काळात घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक अधिकारी, जिल्हा न्यायिक सेवेचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. हिंगोली, जिल्हा प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती सदस्या, बाल न्याय मंडळ सदस्य, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक संदीप कोल्हे आदी उपस्थित होते.

******

No comments: