07 January, 2025

“जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2024” पुस्तकाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते विमोचन

हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत वर्ष 2024 करिता सन 2023-24 या आर्थिक वर्षातील सर्व घटकनिहाय सांख्यिकी माहिती असलेले पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे विमोचन आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड, सहायक संशोधन अधिकारी ए. ए. करेवार, सांख्यिकी सहायक निशा नवले उपस्थित होते. जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत दरवर्षी हिंगोली जिल्ह्याच्या समग्र आढाव्यासह दृष्टीक्षेपात जिल्हा, निवडक निर्देशांक, जिल्हा उत्पन्न, कृषी, जलसंपदा, वने, उद्योग, सहकार, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, उर्जा, जिल्हा वार्षिक योजना व इतर विकास योजना इत्यादी विषयक बाबींच्या अनुषंगाने सांख्यिकी तक्त्यांचा समावेश असलेले जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन प्रकाशन प्रकाशित करण्यात येते. प्रकाशनामध्ये जिल्ह्यामधील कला व संस्कृती, यात्रा, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव, पर्यटन याविषयी विशेष माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. यात जिल्ह्यामध्ये नव्याने निर्माण झालेले हळद संशोधन केंद्र व लिगो-इंडिया प्रकल्प याविषयी सविस्तर माहितीचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकाशनामुळे जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करताना शासनाच्या विविध विभागांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्ह्याशी संबंधित सर्वांगीण आकडेवारी, तपशीलवार माहिती उपलब्ध होईल. तसेच संशोधक व विद्यार्थ्यांना हे प्रकाशन निश्चीत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी व्यक्त केला. ते अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या www.mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशन शिर्षाखाली पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड यांनी केले आहे. *******

No comments: