07 January, 2025

नव्या चिनी विषाणूचे टेन्शन नको, दक्षता घ्या • मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) बाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

हिंगोली (जिमाका), दि. 7 : मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलॅडमध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोन्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यत: आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एनसीडीसी, दिल्ली व संचालक, आरोग्य सेवा,पुणे यांनी निवेदन प्रसिध्द केले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे. हे करा : जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या. सर्दी पडसे व ताप, खोकल्याचे लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून औषधोपचार घ्यावेत. हे करू नये : हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे , नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे, नव्या विषाणूबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. सर्दी-खोकला आणि सारी रुग्णांचे सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चिंतेचे कारण नाही याबाबत आवश्यक दक्षता घ्या भिती बाळगू नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. *******

No comments: