01 January, 2025

श्रावणी गोदरे हिची डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजसाठी निवड

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यातील हिवरा बु.येथील कु.श्रावणी सारंग गोदरे (स्वामी) हिची डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी)साठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचा हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, गट शिक्षणाधिकारी श्री. नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज ही एक अतिशय अवघड परीक्षा समजली जाते. पूर्ण देशातून फक्त 30 विद्यार्थी या परीक्षेमधून निवडले जातात. यात फक्त 5 मुली निवडल्या जातात. देशातील 5 अव्वल मुलींमध्ये तिची निवड झाली आहे. सैन्यदलात उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे ध्येय उराशी बाळगून श्रावणीचा प्रवास सुरू झाला आहे. लेखी, तोंडी आणि मेडिकल या तीन टप्प्यांमधून ही परीक्षा घेतली जाते. अतिशय उच्च दर्जाची ही परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी मिनी युपीएससी समजली जाते. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून ची स्थापना 1922 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने केली आहे. यामध्ये निवड होणारी महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची श्रावणी ही केवळ दुसरी मुलगी आहे. यापूर्वी गंगाखेडची अदिती विष्णू शिंदे हिची निवड झाली होती. श्रावणीच्या यशात आय कॅन कोचिंग क्लासेस सातारा येथील अदिती गावंडे आणि सुखोई अकॅडमी दिल्लीचा महत्वाचा वाटा आहे. मागील चार वर्षापासून तिची तयारी सुरू असल्याचे तिचे वडील सारंग स्वामी सांगतात. अभ्यासाचे काटेकोर नियोजन, सातत्याने वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केल्यामुळे हे यश मिळाल्याचे तिची आई सारिका सांगतात. *****

No comments: