13 January, 2025

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 13 :. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. दि. 29 डिसेंबर, 2023 व दि. 25 जानेवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली-2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू, व्यक्ती यांच्याकडून दि. 26 जानेवारी, 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (scrolling link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि.26 जानेवारी, 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. *******

No comments: