24 January, 2025

हिंगोली जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यात कुष्ठरोग स्पर्श जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान यशस्वीपणे राबवून हिंगोली जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आयोजित आढावा बैठकीत दिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत विविध उपक्रम घेऊन राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलेजा स्वामी, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सुनील देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. बालाजी भाकरे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, हिंगोली जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी 26 जानेवारीच्या ग्रामसभेत कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवावेत. या अभियानात सर्व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे. कुष्ठरोग आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी नजीकच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करुन बहुविध औषधोपचार घ्यावा आणि जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यास मदत करावे, असे आवाहन केले. सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सुनिल देशमुख यांनी कुष्ठरोग जनजागृतीसाठी स्पर्श अभियान दि. 30 जानेवारी ते दि. 13 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 26 जानेवारी, 2025 रोजी सर्व गावात ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाविषयी माहिती देऊन कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करण्यात येणार आहे. यावर्षी आरोग्य विभागाने ‘कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृध्दींगत करु, त्याबाबतचा गैरसमज दूर करु व कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती मागे राहणार नाही याची दक्षता दक्षता घेऊ’ असे घोषवाक्य तयार केले आहे. या अनुषंगाने शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व कुष्ठरुग्णांना शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. गावपातळीवर शाळेमध्ये कुष्ठरोग बाबत रांगोळी, चित्रकला, निबंध लेखन यासह विविध उपक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ******

No comments: