07 May, 2025

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 14 मे पर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि. 07 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2025 या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहेत. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. 10 मे, 2025 ऐवजी दि. 14 मे, 2025 पर्यंत करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्यासाठी दि. 14 मे, 2025 रोजी 23.59 मि. पर्यंत मुदत राहील. दि. 2 मे, 2025 च्या शासन शुध्दीपत्रकानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. मात्र दि. 5 मे, 2025 पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सुधारित तरतुदीचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी पुन:श्च ऑनलाईन आवेदनपत्र भरावे. पुन:श्च भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2025 परीक्षा दि. 24 मे ते दि. 5 जून, 2025 या कालावधीमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बी.एड व एम.एड, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी, उमेदवारांचा परीक्षा कालावधी दि. 24 मे ते दि. 5 जून, 2025 या कालावधीत नियोजित असलेल्या विद्यार्थी, उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx या लिंकद्वारे दि. 14 मे, 2025 पर्यंत सादर करावी. जेणेकरुन शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमता चाचणी परीक्षा-2025 परीक्षेला प्रविष्ठ असलेल्या उमेदवारांचे परीक्षेच्या बॅचेसचे नियोजन करणे सुलभ होईल. उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

No comments: