13 May, 2025

जिल्हा प्रशासन राबविणार '5 स्टार हिंगोलीकर' उपक्रम

हिंगोली (जिमाका), दि. १३ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन '5 स्टार हिंगोलीकर' हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नगर परिषद, नगर पंचायत यांच्या हद्दीतील सर्व घरे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक आस्थापना, खाजगी आस्थापना इत्यादी ठिकाणी पाच निकषांच्या आधारे स्टार रेटिंग केले जाणार आहे. यामध्ये पावसाचे जलपुनर्भरण, घराभोवती किमान पाच झाडे, घरामध्येच कचऱ्याचे विलगीकरण, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील रूफ टॉप सोलर पॅनल, नगर परिषदेमार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा विहित वेळेमध्ये भरणा करणे या पाच निकषांच्या आधारे पुढील दोन महिन्यांमध्ये सर्व नगर परिषदा, नगरपंचायतीमार्फत घरांचे सर्वेक्षण करून त्यांना स्टार रेटिंग दिले जाणार आहे. तसेच यापुढे होणाऱ्या नवीन बांधकामांमध्ये पाचही निकषांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. वरील संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. ***

No comments: