14 September, 2017

वृत्त क्र. 451                                                                                                                       दिनांक  14 सप्टेंबर, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

          हिंगोली, दि. 14 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 साठी कर्जमाफी बाबतचे ऑनलाईन अर्ज आपले सरकार पोर्टलवर दि. 15 सप्टेंबर, 2017 पर्यंतच स्विकारले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरणा केलेले नाहीत, त्यांनी दि. 15 सप्टेंबर, 2017 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन भरणा करावेत व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****   
वृत्त क्र. 452                                                                                                                      
जिल्ह्यात ‘स्वच्छता सेवा’ अभियानाचे आयोजन

          हिंगोली, दि. 14 :  स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपुर्ण देशभर स्वच्छता ही सेवा या नावाने दि. 15 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर, 2017 या कालावधीत स्वच्छता सेवा हे अभियान राबविण्यात येणार आहे. 
            या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रीय स्तरावर मा. राष्ट्रपती महोदय कानपूर येथून करणार आहेत. अभियानामध्ये शासनाच्या सर्व विभागातील वर्ग-1, वर्ग-2, व वर्ग-3 दर्जाचे अधिकारी यांची प्रत्येक ग्रामपंचायतीस संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये संबंधित अधिकारी प्रत्येक गावात भेट देवून स्वच्छता या विषयावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
            यामध्ये प्रामुख्याने गावस्तरावर गृहभेटी देणे स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी, ग्रामसभा आयोजन करणे, कलापथक कार्यक्रम आयोजित करणे, शौचालय उभारणी करीता शोष खड्डे खोदणे, परिसर स्वच्छता, श्रमदान करणे त्याबरोबर प्रत्येक शाळेमध्ये वर्क्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धाचे आयोजन करणे, शाळा व अंगणवाडी मध्ये स्वच्छतागृहाची दुरूस्ती करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्र, बसस्थानके, रेल्वे स्टेशन, गाव तलाव यांची स्वच्छता करणे, तसेच परिसरातील पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविणे या उपक्रमांचा समावेश आहे. सदर अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी हे सहभागी होणार असून सदर अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****

वृत्त क्र. 453                                                                                                                      
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक

        हिंगोली,दि.14: ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी आरक्षित जागेवर उभ्या राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 
            ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यात एकुण 62 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत. यात 13 ग्रामपंचायतीसाठी 26 सप्टेंबर, 2017 रोजी तर 49 ग्रामपंचायतीसाठी 07 ऑक्टोबर, 2017 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती नामनिर्देशन पत्रासोबत घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांचे जात पडताळणी बाबतची संचिका स्विकारण्यास्तव व संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठविण्यासाठी तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्र. 454                                                                                                                     
ग्रामपंचायत निवडणूकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करा
                                                                                      ---जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली,दि.14: ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक कार्यक्रम दि. 1 सप्टेंबर, 2017 रोजी आयोगाने जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायत हद्दित तसेच ग्रामपंचायतीच्या सीमेलगतच्या गावात आचारसंहिता लागु झाली आहे. जिल्ह्यात एकुण 62 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होणार असून, यात 13 ग्रामपंचायतीसाठी 26 सप्टेंबर, 2017 रोजी तर 49 ग्रामपंचायतीसाठी 07 ऑक्टोंबर, 2017 मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आचार संहिता लागू झाली असून निवडणूकी दरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले आहेत.
                सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतमध्ये आचार संहिता लागू झाली असून ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील. ज्या जिल्ह्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात 50 टक्के अथवा त्यापेक्षा कमी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यातही आचारसंहिता लागू राहणार आहे. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचयातीच्या निवडणूका आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या सीमेलगतच्या गावांतही आचारसंहिता लागू राहणार आहे. आचार संहिता लागू केली असली तरी विकास कामावर कोणतेही निर्बंध राहणार नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या मुळे ग्रामपंचायत मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतीही कृती करता येणार नाही असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
            *****


No comments: