17 September, 2017

सातबारा एटीएम मशीनचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

हिंगोली,दि.17: राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बसवलेल्या संगणकीकृत सातबारा एटीएम मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
            यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा सूचना कार्यालयाचे श्री. बारी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात केंद्र शासान पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॉम कार्यान्वित असून त्याअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांनी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. राज्यातील ई-फेरफार आज्ञावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर या ठिकाणी स्थापित केलेला हिंगोली जिल्ह्यातील अधिकार अभिलेखाचा अद्यावत डाटा हा मुळ हस्तलिखित अभिलेखाशी तंतोतंत 100 टक्के जुळविण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 697 गावापैकी 292 गावांतील संगणकीकृत सातबारा (7/12) अद्यावत करण्यात आले आहे.
या एटीएम मशीनमुळे जनतेचे वेळ व कष्ट वाचणार आहे. प्रायोगिक तत्वावर हिंगोली तालुक्याचा अद्यावत संगणकीकृत सातबारा (7/12) जनतेला एटीएम मशीनव्दारे डिजीटल स्वाक्षरीत ऑनलाईन सातबारा (7/12) रुपये 20 मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. भविष्यात इतर चारही तालुक्याचा संगणकीकृत सातबारा (7/12) एटीएम मशीनव्दारे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

*****

No comments: