07 September, 2020

पॉलिटेक्निकल प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 


हिंगोली,दि.7: कोरोनामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यातच ग्रामीण भागात एस.टी. बस सेवा सुरळीत नसल्याने प्रवासही बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2020 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पॉलीटेक्निकल प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि. 13 सप्टेंबर, 2020 रोजी तात्पुरती यादी  तर 18 सप्टेंबर,2020 रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे केंद्रीय पध्दतीने पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा 10 ऑगस्ट पासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी (तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ) यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही संस्थेत न जाता इंटरनेट असणाऱ्या मोबाईल , कम्प्यूटरवरुन अर्ज भरण्याची सोय केली आहे. परंतू यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले अद्याप विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाहीत. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रिमिलेअर दाखला आदी कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा बेभरवशाची आहे. दाखले,अर्ज भरण्यासाठी शहरात जावे तर एस.टी. बससेवा सुरळीत नाही. अशा विचित्र परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. या मुदतवाढीमुळे विद्यार्थ्यांना गुरुवार दि. 10 सप्टेंबर,2020 अखेर http://poly20.dtemaharashtra.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येईल.

दिनांक 13 सप्टेंबरला जाहीर होणाऱ्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर 16 सप्टेंबर अखेर हरकत घेण्याची मुदत आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरला अंतिम यादी संकेतस्थळावर प्रसिध्द होईल.

हिंगोली जिल्ह्यात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन संस्था असून येथे अत्यल्प शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. याशिवाय शासनाच्या विविध शिष्यवृत्यांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. या (राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती तसेच वसतीगृह निर्वाह भत्ता ई.) संस्थेमध्ये 100 क्षमतेचे मुलांचे वसतीगृह तसेच 40 क्षमतेचे मुलींचे वसमतीगृह तसेच याशिवाय 100 क्षमतेचे अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह आहे.

शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग 120 जागा, ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरींग 60 जागा व कॉम्प्युटर इंजिनिअरींग 60 जागा तसेच टिएफडब्ल्यूएस 09 जागा अशा एकूण 249 जागांसाठी व बारावी नंतरच्या थेट द्वितीय वर्षासाठी पदविका अभ्यासक्रमाच्या एकूण 30 जागांच्या वरील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया आता 10 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरु राहणार आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. रणजिंत सावंत यांनी केले आहे.

 

****

No comments: