19 September, 2020

जिल्हा प्रशासन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी सज्ज -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 


 

              हिंगोली,दि.19 : कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असुन त्याकरीता प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत आहे. परंतू नागरिक नियमाचे पालन करत नसल्याने कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि. 19 सप्टें.) आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.

            यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला असुन कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविणे हा या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेतंर्गत्‍ जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची सुरुवात झाली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहचून आरोग्य शिक्षण देऊन प्रत्येक सदस्यांची तपासणी करणार आहे. जिल्ह्यामध्ये 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि 12 ते 24 ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरविकास, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरी जावून कुटूंबातील सर्व सदस्यांची  तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण याची तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात रूग्ण आढळल्यास त्याची कोविड चाचणी करून त्यास उपचारही देण्यात येणार आहेत. तसेच कुटूंबातील सर्व सदस्यांशी संवाद साधुन कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षणही देण्यात येणार आहे.

            या मोहिमेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील घरांना भेट देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात आले असुन प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे 1 वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य पथक पहिल्या दररोज 50 घरांना भेट देवून कुटूंबातील सर्व सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी करुन आवश्यकता असल्यास जिल्हा कोरोना रुग्णालय, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटर या ठिकाणी पुढील उपचाराकरीता संदर्भित करणार आहे. तसेच कोरोनाविरुध्दच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्वाचे असून प्रत्येकाने आरोग्य विषयक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी. कोरोनामुक्तीच्या लढ्यात सर्वांनी सहभागी होवून नियमित मास्कचा वापर करावा, शारिरीक अंतर ठेवून, वारंवार हात धुवावेत तसेच सामाजिक जबाबदारी पालन करुनच आपणां सर्वांना कोरोनापासून सुरक्षीत राहता येणार असल्याचे अवाहन ही जयवंशी यांनी यावेळी जनतेला केले आहे.

            ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सार्वजनीक आरोग्य विभागामार्फत शहरी आणि ग्रामीण भागासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याची 13 लाख 35 हजार 753 लोकसंख्या असुन यामध्ये  शहरी भागात 2 लाख 26 हजार 73 असून 39 हजार 594 घरे आहेत. यासाठी 101 पथके स्थापन करण्यात आली असून यामध्ये 303 कर्मचारी व उपचारासाठी 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदर्भ सेवेसाठी 5 ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध असणार आहेत.

            तर ग्रामीण भागात 11 लाख 9 हजार 680 लोकसंख्या असून 1 लाख 88 हजार 529 घरे आहेत. यासाठी 494 पथके स्थापन करण्यात आले असून 1 हजार 482 कर्मचारी व उपचारासाठी 29 वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदर्भ सेवेसाठी 24 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

            यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भाग मिळून एकुण 2 लाख 28 हजार 123 घरांसाठी 595 पथके तयार करण्यात आली असून यामध्ये एकुण 1 हजार 785 कर्मचारी व उपचारासाठी एकुण 37 वैद्यकीय अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संदर्भ सेवेसाठी एकुण 29 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

****

 

No comments: