04 September, 2020

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका...

 

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका...

 

हिंगोली, दि.4: दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कोरोनाशी दोन हात या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी कोरोना: अवास्तव भीती व गैरसमज याविषयी केलेल्या चर्चेचा तिसरा भाग आज प्रसारीत झाला. त्याचा संपादीत अंश.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : कोरोनाबद्धल नक्की कोणते गैरसमज आहेत? त्याची भीती ही कशाप्रकारची असू शकते?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : लोक भीतीपोटी खूप मोठमोठ्या चुका करीत आहेत आणि त्यांची मानसिकता अस्वस्थताही आली आहे. परंतु आज ८० वर्षे वयापेक्षा जास्त असलेले किमान ५००० रुग्ण तसेच ९० वर्षे वयापुढील जवळजवळ ६०० लोक आजपर्यंत बरे झाले आहेत. १०० वर्षे वयाच्या पुढचे ५-१० लोकसुद्धा बरे झाले आहेत. एकंदरीत कोरोनाबाधीत ९७ टक्के रुग्णांचा मृत्यू होत नाहीत. आत्ता मृत्यूची टक्केवारी ३ टक्के आहे. एकूणच जर इन्फेक्टेड नसलेले आणि  इन्फेक्शन होऊन बरे झालेले जर एकंदरीत रुग्ण गृहीत धरले तर मृत्यूचे प्रमाण ०.१ टक्के म्हणजे १००० मध्ये एक मृत्यू होऊ शकतो. परंतु यामध्ये मानवाला मृत्यूची भीती वाटते.

कोरोनाबाधित रुग्ण १०-१२ दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात. ही लक्षणांवर आधारीत उपचार पद्धती आहे. यावर आपण लक्षणे आधारितच उपचार करतो. त्यात काही मोठी शस्त्रक्रिया वगैरे असे काहीच नाही. सायटोकॉईन स्टॉर्म मध्ये आपले शरीर बॉडी आपल्याच सेल्सला मारते. सायटोकॉईन स्टॉर्म चे एक कारण कधीकधी काहीशी भीतीसुद्धा असते. त्यामुळे भीती बाळगू नका.  "जान है तो जहान है"आपण जगलोच नाही तर मग माझ्या बिझिनेसचे काय होईल? माझ्या शेतीचे काय होईल? माझ्या नोकरीचे काय होईल? माझ्या मुलाबाळांचे काय होईल? हि भीतीची अनेक उदाहरणे दिली... पण जर आपण जगलो तरच या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक पुढे करू शकू.

आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये ह्या गोष्टीचे आपण शिक्षण घ्यावे. आपण काळजी घेऊन काम केले तर तसा काही  प्रॉब्लेम येत नाही. आपण योग्यपद्धतीने काळजी घ्यावी. भीती न बाळगता, काळजी घेत काम करत रहावे हाच सध्या कोरोनाबरोबर जगण्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे.

  

श्री. शांतिलाल मुथ्था :एखाद्याला जर कोरोना झाला तर समाजाचा, घरातील लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन यामुळे  एक पॅनिक क्रिएट होतो या संदर्भात आपण काय सांगाल ?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : एखादा कोरोनाबाधीत झाला तर त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. मी एक पनवेलमधील घटनेचे उदाहरण देईल, ज्यामध्ये आई  असिम्प्टोमॅटीक होती, ती बरी झाली. ती बरी झाल्यानंतर तिला घरात घ्यायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटलं आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. आई-मुलाचं नातंसुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे दुरावल्यासारखे झालं. त्यामुळे आपली नाती तोडू नका, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कोरोनामुळे कुणालाही वाळीत टाकण्याची मानसिकता ठेऊ नका. आपण आपला मास्क घालावा त्यांना मास्क द्यावा, ठराविक अंतर ठेवावं आणि आपले हात वारंवार धुवावेत. त्यामुळे शिक्षित व्हावं परंतु तो प्रेम-जिव्हाळा अजिबात कमी होता कामा नये. एवढी माझी हात जोडून नम्रतेची पोटतिडकीने आपल्या सगळ्यांना विनंती आहे.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : याउलट काही ठिकाणी तर चांगली उदाहरण बघायला मिळाली. पत्नीला कोरोना झाला व पती तिला स्वतःहून दुचाकीवरून घेऊन गेलाय. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने स्वतःहून तिची काळजी घेतली आणि त्याला कोरोना नसताना तो तिच्याबरोबर राहिला. कारण त्याला तिची सेवा करायची होती. अशाही घटना आपल्याकडे आहेत.

 

आरोग्यमंत्री  राजेशटोपे : दोन्ही बाजू आहेत. जशा नाण्याला असतात. मला असं वाटतं की समाजात चांगलेही लोकं आहेत. पण पनवेल सारख्या काही घटना घडल्यानंतर मनाला वेदना होतात. मला वाटतं की या काही घटना घडू नयेत. ती उदाहरणे कुणीच घेऊ नयेत. तुम्ही सांगितलेले उदाहरण खऱ्या अर्थाने घ्यावे. त्यात एवढीच बाजू आहे की आपण शिक्षित होऊन सुरक्षित राहून आपली सेवा द्यावी.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : लोकांना जी भीती वाटते ती अनाठायी आहे. पूर्वी जेंव्हा एचआयव्ही आला तेंव्हा तो आजार झालेल्यांना वाळीत टाकलं होते. हे अज्ञान होते जे कालांतराने त्यांना कळले. पण त्याच्यासाठी ५-१० वर्षे निघून गेली. म्हणजेच १० वर्षांनतर कळले की विनाकारण आपण त्याचा बाऊ केलाय. आता त्याच पद्धतीने याचा बाऊ केला जातोय?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : अज्ञान आणि भितीतून अशा रुग्णांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडतात. या दोन्ही गोष्टींच्या जर मुळाशी गेलो तर एकच आपल्याकडे उत्तर आहे की अज्ञान दूर केले पाहिजे आणि भीती बाळगली नाही पाहिजे. कोणी वयस्कर आहे, अन्य आजार आहेत तरी त्यामुळे न घाबरता योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखता येतो.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : एका कोरोनाबधिताचा प्रवास पुढीलप्रमाणे असू शकतो. होम आयसोलेशन करणे-कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवणे-हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणे-ऑक्सिजन बेडवर ठेवणे-व्हेंटीलेटर बेडवर ठेवणे-आय.सी.यु.मध्ये ठेवले जाणे. सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटीलेटर मिळत नाही, अमकं नाही, तमकं नाही याचा बाऊ खूप मोठ्याप्रमाणावर झालेला आहे. या संदर्भात मार्गदर्शन करावं.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : कोरोना विषाणूचा मुख्य गुणधर्म हा संसर्गाचे प्रमाण जास्त जास्त आहे. परंतु याची जगातली टक्केवारी पाहिली तर ८० टक्क्यांपर्यंत लोकं असिम्प्टोमॅटीक असतात म्हणजे लक्षणे नसलेले. तर अशा लोकांचा प्रवास काही एवढा लांबलचक नसतो. तो असिम्प्टोमॅटीक असल्याने आणि त्यांना कुठलीही कोमॉर्बीडीटी नसल्याने त्याला एकदम सौम्य स्वरूपातील आजार आपण म्हणू शकतो.

कोरोनाची तीन स्वरूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी १० दिवस सीसीसीमध्ये (कोरोना केअर सेंटर) राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो. झिंक, व्हिटामिन सी, पौष्टिक जेवण देऊन आपण त्यांना बरे करतो.

उर्वरित १५ टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही लोकांच्या तोंडाची चव जाते, काही लोकांना जेवावसं वाटत नाही. काही लोकांना माईल्ड स्वरूपात ऑक्सिजन लागतो. जिथे एसपीओटू (SPO2) ९० पेक्षा खाली गेलेला आहे. याला आपण मध्यम म्हणतो. हे सर्व लोक बरे होतातच. उर्वरित काही २-३ टक्के रुग्ण गंभीर असतात.

आज साडेसहा लाख लोक बाधित झाले आहेत.  आज चाचण्यांसाठी शासनाच्या २७०-७५ लॅब व  खासगी ७०-७५ अशा सगळ्या मिळून ३६९ लॅबमधून २४ तासात रिपोर्ट येत आहेत. अँटीजेन टेस्ट आणि अण्टीबॉडी टेस्ट वाढवल्या आहेत. मी पुन्हा एकच सांगेन कि, सातत्याने गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले हे सगळे निर्णय आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

 

००००

        मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत होत आहे.

        शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी कोरोनासह जगण्याची तयारी

        रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व

        सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयांवर चर्चा होणार आहे.

000000

 

 

 

No comments: