29 September, 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, दि.29 : जिल्ह्यात फलोत्पादनामध्ये दिवसेंदिवस होत चाललेली वाढ लक्षात घेता फळे व भाजीपाला या पिकांची व्यवसायिक पध्दतीने लागवड करुन घेता यावे तसेच निर्यात करता यावे. यासाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोग मुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतक-यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पिक रचनेत बदल घडवून आणने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा दर्जेदार किड व रोग मुक्त रोपे तयार करण्यास लहान रोपवाटीका उभारण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु केली आहे.

शेतक-यांना स्वत:च्या मालकीचे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे व कायम स्वरुपी पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या योजनेस महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट, महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य  राहील.  तसेच भाजीपाला उत्पादक व अत्यल्पभूधारक शेतकरी यांना तृतीय प्राधान्य राहील. इच्छुक शेतक-यांनी MahaDBT या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. अर्ज करण्याची प्रक्रीया दि. 02 ऑक्टोबर 2020 ते दि. 19 ऑक्टोबर, 2020 या दरम्यान राहील याची नोंद घ्यावी.

या योजनेस जास्तीत जास्त 10 गुंठे क्षेत्र अनुदानास पात्र राहील व प्रकल्प खर्च मर्यादा 4 लाख 60 हजार एवढी असून अनुदान 02 लाख 30 हजार असणार आहे. हे अनुदान दोन हप्त्यामध्ये वितरीत करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन  अभियान धरतीवर राबविण्यात येईल. या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणी नंतर प्रकल्प प्रथम हप्ता 60 टक्के व उर्वरीत द्वितीय हप्ता 40 टक्के अनुदान वितरीत करण्यात येईल.

योजनेचा कालावधी सन 2020-21 व सन 2021-22 असा राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धारकानी यापूर्वी शेडनेट हाऊस, पॉली हाऊसचा कुठल्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. लक्षांकापेक्षा जास्तीचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने अर्जाची निवड करण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र शेतक-यांनी अर्ज करावेत असे आवाहन येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  विजय लोखंडे यांनी केले आहे.   

*****

No comments: