17 September, 2020

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

 


 

        हिंगोली, दि.17: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस सुरुवात झाली आहे. या मोहिमे अंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहचून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.

            हिंगोली येथील नगर परिषदेमार्फत नाईक नगर येथे राबविण्यात येणा-या या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक यागेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मोहिमेसाठी आरोग्य विभागामार्फत पथके नेमण्यात आली असून ही पथके महिनाभरात किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटूंबांपर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेत दररोज 50 घरांना भेट देवून कुटूंबातील सदस्यांची आरोग्याविषयक तपासणी करुन आवश्यकता असल्यास पुढील उपचार देण्यात येणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्वाचे असून प्रत्येकाने आरोग्यविषयक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेत मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर राखणे व हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करुनच आपणा सर्वांना कोरोनापासून सुरक्षित राहता येणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी योगदान दिल्यास कोरोना नियंत्रणाचे लक्ष्य साध्य करता येणार आहे.

*****

 

 

No comments: