22 September, 2020

बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातंर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातंर्गत कर्ज प्रकरणे

मंजूर करुन लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे

                                         -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

 

              हिंगोली,दि.22: अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आले असुन प्राप्त झालेले कर्ज प्रकरणे मंजूर करुन पात्र लाभार्थ्यास तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांनी दिले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या उद्दिष्ट पूर्ततेचा आढावा आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी डीएलसीसी बैठकीमध्ये घेतला त्यावेळी ते बोलत होते. बऱ्याच बँका या पीक कर्ज वाटपाचे कारण सांगून महामंडळाच्या कर्ज प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याच्या लाभार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व बँकांनी लाभार्थ्यांस कर्ज प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना त्याची पोहोच पावती देण्याचे निर्देश बँकांना दिले. तसेच महामंडळाकडुन प्राप्त होणारी कर्ज प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बँकांना दिले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना राज्यातील ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी करण्यात आली आहे.

            लाभार्थ्याना आपले कर्ज प्रकरण आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात सादर केल्यानंतर सदर कर्ज प्रकरणांची पडताळणी केली जाते. नंतर प्रकरण बँकेकडे शिफारस करण्यासाठी पाठविले जाते. बँकेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकरण महामंडळाकडे पाठविले जाते. त्यानंतर प्रकरणाची छाननी करुन महामंडळाकडून जिल्हास्तरावर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बीज भांडवल बँकेकडे वर्ग केले जाते आणि बँकेमार्फत लाभार्थ्यास कर्ज वितरण केले जाते.

           

****

 

 

No comments: