11 May, 2021

हळद लागवड तंत्रज्ञानाविषयी ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन

 

शिवशिवार शेतकरी उत्पादक कंपनी आणि रिलायन्स फौंडेशनचा सहभाग

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : एमसीडीसी व नाबार्ड पॉपी प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत शिव शिवार शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, जि. हिंगोली आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हळद लागवड तंत्रज्ञान या विषयी गूगल मीट ॲपद्वारे दि. 10 मे, 2021 रोजी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत एमसीडीसी पुणेचे कृषी व्यवस्थापक व विपणन तज्ञ गणेश जगदाळे यांनी हळद लागवड  खरीप हंगाम पूर्व तयारी कशी करावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी शेतकऱ्यांना हळदी पासून प्रक्रिया उद्योग तसेच सोयाबीन, हरभरा, तूर या पिकापासून सुद्धा छोटे उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन केले. आत्मनिर्भर योजनेतून शेतकऱ्यांना 35 टक्के सबसिडीचा लाभ घेता येतो. या लाभ घेण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक  पी.एम.जंगम यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी एखादा उद्योग प्लॅन तयार करावा व शेतकरी उत्पादक कंपन्यानी आपले सभासद वाढवावे अशी सूचना केली .

रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे व्यवस्थापक दिपक केकण यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळकट बनवण्यासाठी त्यांना निरंतर मार्गदर्शनाची गरज असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे. यासाठी रिलायन्स फाउंडेशनही कृषि विज्ञान केंद्रासोबत निरंतर कार्य करीत आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले .

कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, हिंगोली चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ.पी.पी शेळके यांनी 30 टक्के शेतकरी चांगली शेती करतात.इतर शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात त्यांची जमीन हलकी असते,पाण्याची कमतरता असते,त्यामुळे उत्पन्न कमी होते.उत्पन्न वाढीसाठी सर्व शेतक-यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. हळद पीक लागवड करण्यात येणाऱ्या जाती सेलम,कृष्णा,राजापुरी,प्रगती,प्रतिभा ह्या आहेत.त्या पैकी प्रगती आणि सेलम वाणाचा शेतक-यांनी वापर करावा असे सांगितले. 

कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, हिंगोली चे  उद्यान विद्या विभागाचे विशेषज्ञ प्रा. अनिल ओळंबे यांनी शेतकऱ्यांना हळदीचे महत्व ,उत्पादन वाढविण्याची सूत्रे,जमिनीची निवड,हवामान,बेणे निवड,बियाण्या चे प्रकार,बेणे प्रक्रिया करण्यासाठी क्वीनालफॉस 20 मिली+कार्बनडाझिम 20 ग्रॅम आणि जैविक अझोटोबॅक्टर , पिएसबी ,5 ग्रॅम 10लिटर पाणी घेऊन बीजप्रक्रिया करावी.प्रात्यक्षिक दाखवून हळद व्यवस्थापन विषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र तोंडपुर चे पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा.अजयकुमार सुगावे यांनी शेतकऱ्यांना निरोगी बियाण्याचा वापर करावा, जमिन हलकी ते मध्यम परंतु पाण्याचा निचरा होणारी निवडावी.रोग निंयत्रणासाठी महत्वाच्या बाबी हळद पिकात पाणी साचू देऊ नये,वेळोवेळी चर काढावेत. हळदीची पाने पिवळी पडण्याची कारणे प्रात्यक्षिक दाखवून सखोल असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक शशिकांत सावंत, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस.एस.बोराडे, पुणे येथील एमसीडीसीचे विभागीय व्यवस्थापक अमोल पाचडे, तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्या शास्त्रज्ञ प्रा. राजेश भालेराव , सचिव सुनील पतंगे, सीईओ शुभांगी अंभोरे, प्रल्हाद चव्हाण , शिवाजी अंभोरे , संपत पतंगे , शरद पतंगे, देवराव करे हे कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. तसेच परिसरातील सोडेगाव, वारंगा, हरवाडी, रेनापूर, नांदापूर, सावंगी, सालेगाव, महेश गाव, टाकळगव्हाण गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी तज्ञांना प्रश्न विचारुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन घेतले.

शिवशिवार शेतकरी उत्पादक कंपनीचे रत्नाकर सावळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे संचलन  शिवशिवार शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष शिवाजी निळकंठे आणि आभार प्रदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल बनसोड व  कार्यक्रम सहायक दशरथ वाळवंटे यांनी केले.

 

****

No comments: