05 May, 2021

'जलशक्ती अभियान अंतर्गत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन' शेतक-यांनी सिंचनासाठी “फुले इरिगेशन शेडुलर” तंत्रज्ञान वापरावे

 

'जलशक्ती अभियान अंतर्गत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन'

शेतक-यांनी सिंचनासाठी फुले इरिगेशन शेडुलर तंत्रज्ञान वापरावे

    महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार यांचे आवाहन.

हिंगोली, (जिमाका) दि. 5 : भारत सरकारच्या जलशक्ती अभियान अंतर्गत "पाण्याची किंमत" (Valuing Water) विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली व शेकरू टी. व्ही. यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 04 मे रोजी दुपारी 12.00 वाजता करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील शेती व त्याकरिता पाण्याचे नियोजन करून पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे या बाबत आपल्या प्रस्तावनेत कृषी विज्ञान केंद्राचे  वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी मार्गदर्शन केले.   या वेबिनार मालिकेत महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील मा. डॉ. सुनील गोरंटीवार, विभाग प्रमुख, कृषि अभियांत्रिकी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी चे प्रा. सुमंत जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते.

पहिल्या  मार्गदर्शन सत्रात व.ना.म.कृ. वि. परभणीचे सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक  डॉ. सुमंत जाधव यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा आत्मा-पाणी गाळण यंत्रणा या विषयी सखोल मार्गदर्शन केले.  त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ठिबकच्या फिल्टरचे विविध प्रकार कसे आणि कुठे वापरावे यांचे विस्तृत विवेचन केले.  खुल्या पाण्याच्या स्त्रोत मधून पाणी घेण्यासाठी हायड्रोसायकलोन पद्धतीचा फिल्टर , वाळूचा फिल्टर तसेच स्क्रीन फिल्टर वापरावा लागतो.  बोअरवेल  मधील पाण्यामध्ये शेवाळ येत नाही म्हणून फक्त वाळूंचा फिल्टर आणि स्क्रीन फिल्टर वापरला तरी चालतो. सूक्ष्म पद्धतीने गाळणी करून पाहिजे असल्यास त्या साठी डिस्क फिल्टर वापरता येते असे त्यांनी सांगितले.

दुस-या मार्गदर्शन सत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार यांनी "पाण्याच्या उत्तम वापरासाठी माहिती  तंत्रज्ञावर आधारित सिंचन  व्यवस्थापन"  या विषयावर मार्गदर्शन केले. उपलब्ध पाण्याच्या 55 टक्के पाणी हे शेती करीता वापरात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पिकांना  पाणी केंव्हा व  किती द्यावे यावर  सखोल मार्गदर्शन केले.  रियल टाइम सिंचन व्यवस्थापन व त्यांनी विकसित केलेल्या "फुले इरिगेशन शेड्युलर" ॲप विषयी संपूर्ण माहिती व त्याचा वापर शेती मध्ये कसा करावा या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

सदर ॲप कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली शेतकऱ्यांमध्ये विशेषतः हळद उत्पादनामध्ये  लोकप्रिय  करणार असल्याचे डॉ. पी. पी. शेळके यांनी सांगितले. हळद पीक घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करीत असल्यामुळे त्यांची सिंचनची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात येईल असे सांगितले. त्या साठी कृषि विज्ञान केंद्रात असलेले हवामान केंद्र विद्यापीठाशी संलग्न करून शेतक-यांना सिंचन साठी मार्गदर्शन करता येईल असे सांगितले.

या कार्यक्रमाचे संचलन कृषिविद्या  विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. राजेश भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. अनिल ओळंबे यांनी केले. शेकरू टी. व्ही. चे  अनंत कृष्णमूर्ति , तसेच विभीषण बागल व त्यांच्या टीमचे सहकार्य  लाभले. या वेबिनारला जिल्ह्यातील शेतकरी, कृषी अभियांत्रिकी व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी व कृषी निविष्ठा विक्रेते इत्यादी उपस्थित होते.

*****

No comments: