14 May, 2021

आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


 

हिंगोली (जिमाका) , दि. 14 : आगामी मान्सून ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी बैठक-2021 या बैठकीत श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, राज्य राखीव पोलीस दलाचे महानिदेशक संदीपसिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. जयवंशी म्हणाले की, सद्यपरिस्थितीत आज आपण कोरोना सारख्या आपत्तीचा सामना करत आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याही वर्षी ही परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा देखील आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे.  यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. तसेच याठिकाणी अन्सरींग मशीन ठेवून येणाऱ्या सर्व कॉलची नोंद ठेवावी. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा समावेश करावा. तसेच प्रत्येक गावातील तीन जबाबदार नागरिकांचे नेहमी सुरु असणारे संपर्क क्रमांकांची यादी तयार ठेवावी. जिल्ह्यात सर्व मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कार्यरत असून ते सुस्थितीत असेल याची खात्री करुन आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्र त्वरीत खरेदी करावेत. नागरी व ग्रामीण भागातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घ्यावेत. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करावेत, अशा सूचना दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंदक्रांत सूर्यवंशी म्हणाले की, तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील ' नद्या आणि पाणी साठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तसेच सर्व जल संस्थाचे सर्वेक्षण करुन आवश्यक ती देखभाल दूरुस्ती करुन घ्यावी. तसेच जिल्ह्यातील ज्या जल संस्था आहेत त्या कोणत्या यंत्रणेच्या अधिपत्याखाली आहेत, तसेच त्याचे नियंत्रण अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची सविस्तर माहिती दहा दिवसात सादर करावी. तसेच गावांना नदी पाणी पातळीचा धोका होवू नये याबाबत उपाययोजना करावी. तसेच इशारा पातळीबाबतची माहिती दैनंदिनरित्या सादर करावी, अशा सूचना श्री. सूयवंशी यांनी दिल्या.

महावितरणने जिल्ह्यातील सर्व रोहित्रांची व लोंबकळणाऱ्या तारांची तपासणी करुन त्याची देखभाल दुरुस्ती करुन घ्यावी. तसेच यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज पुरवठ्याचे नियोजन कसे करणार याची माहिती सादर करावी.

            आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करावा. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणूक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करावा. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या  आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखावा. तसेच पशुसर्वंधन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगाचा प्रसार होऊ नये व रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण करावे, अशा सूचनाही श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.

            नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्व‍ित करुन, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवून आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच शहरातील नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करुन शहरातील नाल्याची दुरुस्ती करावी जेणेकरुन शहरामध्ये पाणी तुंबणार नाही व पाण्याचा विसर्ग होण्यास मदत होईल, असे पहावे, अशा सूचना श्री. सुर्यवंशी यांनी दिल्या.

            सार्वजनिक बांधकाम विभागाने व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काही लहान व धोकादायक पुलावरुन पावसाळ्यात पाणी वाहते. त्या वाहत्या पाण्यातून लोक ये-जा करतात व प्रसंगी जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुलावरुन प्रवास करु नये असे सूचना फलक लावावे व अशा पुलाची यादी तयार करावी. यामुळे पुढील धोका टाळता येते.  रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या काढून रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वृक्ष उन्मळून पडल्यास ते तात्काळ हटविण्याची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वेक्षण करुन त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेतच करुन घ्यावी. तसेच  रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. 12, गृहरक्षक दल, पंचायत समिती या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असणाऱ्या सर्व विभागांनाही आपापल्या यंत्रणांची पूर्वतयारी करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी दिल्या.

यावेळी बैठकीस उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जे. के. कांबळे, कृष्णा कांगुले, मयूर खेंगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

****

No comments: