09 October, 2023

 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी 11 ऑक्टोबर रोजी

जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन

                                                                                                             

  हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत बुधवार,दि. 11 ऑक्टोबर, 2023  रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.

पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि. अमरावती या कंपनीमध्ये पिकर-पॅकर, वॉयर-हर्नेस मशनी ऑपरेटरची दहावी, बारावी, आयटीआय शैक्षणिक पात्रतेची 25 पदे भरावयाची आहेत. यासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. या पदासाठी 10 हजार ते 12 हजार रुपये वेतन मिळणार आहे.

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. नागपूर (मायक्रो फायनान्स) कंपनीमध्ये ट्रेनी केंद्र मॅनेजरची बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रतेची हिंगोली, परभणी, नांदेडची एकूण 40 जागा पुरुष 19 ते 30 व महिला 19 ते 35 वयोगटातील उमेदवारामधून भरावयाची आहेत. यासाठी स्वत:ची टुव्हीलर आणि लायसन, ई-आधार आवश्यक आहे. या पदासाठी 11 हजार 500 मासिक प्रोत्साहन भत्ता अधिक पेट्रोल भत्ता अधिक वार्षिक बोनस अधिक राहणे फ्री आहे.  

या महिन्याच्या बुधवार दि. 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि. अमरावती, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. (मायक्रो फायनांस) नागपूर या आस्थापना/कंपनीचे उद्योजक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार 60 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली असून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****   

No comments: