21 November, 2023

 सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरोग शोध मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश

                                                        - मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

 

* हिंगोली जिल्ह्यात 20 नोव्हेंबर पासून सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरोग शोध मोहिम सुरु

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 21  :  जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर, 2023 पासून कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरु करण्यात आली आहे. ही मोहिम दि. 6 डिसेबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन संशशित कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधणार आहेत. जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसुत्रीने ही संयुक्त शोध मोहिम यशस्वी करावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी आयोजित बैठकीत दिले.

येथील जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिम आणि नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिष रुणवाल व सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सुनिल देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमे अंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहे. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषध उपचाराने संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 11 लाख 14 हजार 911  लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गृहभेटी दरम्यान 2 लाख 22 हजार 599 इतक्या गृहभेटीचे नियोजन केले आहे. यासाठी 1 हजार 154  पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

ही लक्षणे असल्यास करा तपासणी :

अंगावरील फिकट, लालसर चट्टा, चकाकनारी तेलकट त्वचा, अंगावर गाठी असणे, हातापायाला बधीरता असणे अशी लक्षणे असल्यास कुष्ठरोग असू शकतो. तसेच दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावने ही क्षयरोगाची लक्षणे असू शकतात.

 

******

No comments: