03 November, 2023

 

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर

सर्वसाधारण मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  मा. मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दि. 27 ऑक्टोबर, 2023 ते 09 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये नागरिकाकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 अंतर्गत शनिवार दि. 04 नोव्हेंबर 2023, रविवार दि. 05 नोव्हेंबर, 2023, शनिवार दि. 25 नोव्हेंबर, 2023 व रविवार दि. 26 नोव्हेंबर, 2023 या चार दिवशी जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94- हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष शिबीरे घेण्यापूर्वी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडुन मतदार नोंदणी दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीमध्ये मतदारांच्या तपशिलात काही त्रुटी असल्यास त्याच ठिकाणी विहित नमुन्यातील नमुना आठ मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच दि. 01 जानेवारी, 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र मतदारांचे नाव मतदार यादींमध्ये समाविष्ट करुन विहित नमुना नं. 6 मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच नवविवाहीत महिला यांचे फॉर्म नं. 6 भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांगाबाबत आणि भटक्या जाती व जमाती यांचे मतदार नोंदणीसाठी फॉर्म 6 भरुन घेण्यात येणार आहे. मतदार यादीमधील मयत मतदारांचे नमुना 7 मध्ये अर्ज भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: