09 November, 2023

 

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी परिणामकारक मूल्यमापनाची गरज

या विषयावर प्रशिक्षण संपन्न

 


          हिंगोली (जिमाका), दि. 09 : महिला बाल विकास विभाग, युनिसेफ आणि मिरॅकल फाऊंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात कुटुंब आधारित व पर्यायी संगोपन या कार्यक्रमांतर्गत कुटुंबाचे महत्व, वैयक्तिक काळजी आराखडा आणि सामाजिक चौकशी अहवाल यावर एक दिवशीय प्रशिक्षण दि. 8 नोव्हेंबर, 2023 रोजी हिंगोली येथे यशस्वीपणे संपन्न झाले.

            या प्रशिक्षणासाठी मिरॅकल फाऊंडेशन इंडिया पुणेचे सहायक व्यवस्थापक सागर शितोळे प्रशिक्षक म्हणून लाभले होते. त्यांनी कुटुंबाचे मूल्यमापन, त्यांचे नमुने, त्यांचा उद्देश आणि प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर यांनी मुलांच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने निर्णय होण्यासाठी बालक आणि कुटुंब यांचे सर्वांगीण , परिणामकारक मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच बालकाच्या योग्य त्या पुनर्वसनासाठी बालगृह यांनी पुढाकार घेऊन काम करावे. तसेच यामध्ये मदत करण्याचे व प्रशिक्षणानंतर नियमित पाठपुरावा व अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

            बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे यांनी बालकांच्या हिताच्या दृष्टीने कुटुंब सक्षमीकरणाचे काम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंब हेच महत्वाचे असल्याचे सांगिते. त्याचबरोबर मुलांचे पुनर्वसन करताना इतर पर्यायी संगोपनाचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी वेळोवेळी संस्थांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर इतर सहभागी यांच्यासोबत समन्वय साधून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक चांगल्या पध्दतीने काम करता येईल याची खात्री दिली.

            या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण यांनी केले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण 24 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कर्मचारी, बाल कल्याण समिती सदस्य आणि चाईल्ड हेल्प लाईन 1098 हिंगोलीचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे.  

*****

No comments: